कुडाळ येथील घटना – चारजण गंभीर जखमी
प्रतिनिधी/ सातारा
कुडाळ, ता. जावली येथे पोलीस ठाण्यापासून जवळच उभ्या असणाऱया उसाच्या ट्रॉलीला ओमनी कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रविवारी पहाटेच्या वेळी अपघात झाला. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी सातारला पाठवण्यात आले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, मेढा, ता. येथील भाजीपाला व्यापारी आनंद ढेबे हे होलसेल भाजीपाला आणण्यासाठी ओमनी कार क्रमांक (एम.एच.08आर – 0940) मधुन रविवारी पहाटेच्या सुमारास वाईकडे निघाले होते. दरम्यान, कुडाळ पोलीस ठाण्यापासून जवळ रस्त्याच्या कडेला ऊसाने भरलेली ट्रक्टर ट्रॉली उभी होती. या ट्रॉलीला ओमनी कारने जोरदार धडक दिली.
ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेच्या आवाजाने तसेच गाडीतील लोकांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील लोक झोपेतून जागे होऊन घटनास्थळी धावले. कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाव्हळ तसेच कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या ओमनीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, ओमनी कार ऊसाच्या ट्रॉलीत एवढी अडकली होती की ती काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले.