प्रतिनिधी / कोल्हापूर
वरणगे पाडळी (ता. करवीर) येथे ऊस तोडण्यासाठी बीड जिह्यातून आलेल्या ऊस तोडणी कामगारावर खूनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिध्देश्वर भागवत सातपुते (वय 25, मुळ रा. कुटेवाडी, जि. बीड, सध्या रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे.
या प्रकरणी संशयीत हल्लेखोरांने बाळू संटवाजी कुटे (वय 37, रा. बीड) याच्याविरोधी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने घटनेनंतर पलायन केले असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेची माहिती समजताच करवीरचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी भेट दिली.
पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी, जखमी सिध्देश्वर सातपुते आणि संशयीत आरोपी बाळू कुटे हे दोघे यंद्याच्या ऊस गाळप हंगामामध्ये ऊस तोडणी कामगार म्हणून कामावर आले आहे. दोघे ही एकाच ऊस तोडणी टोळीमध्ये करीत आहेत. या टोळीकडून वरणगे पाडळी येथे ऊसाची तोडणी केली जात आहे. ऊस तोडताना या दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन दोन दिवसापूर्वी शाब्दीक वादावादी झाली होती. 26 जानेवारी रोजी सकाळी ट्रक्टर-ट्रॉलीमध्ये ऊस भरत असताना या दोघांच्यामध्ये पुन्हा शाब्दीक वादावादी सुरु झाली. त्यातून चिडून जावून संशयीत आरोपी बाळू कुटे याने सिध्देश्वर सातपुते यांच्यावर कोयत्याने डोक्यात वार केला. हा वार वर्मी बसून सिध्देश्वर सातपुते गंभीर जखमी झाला. त्याला त्यांच्या नातेवाईकांनी त्वरीत सीपीआर हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.