आर्ट्स सर्कलच्यावतीने शास्त्रीय सहगायन कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
आर्ट्स सर्कलने आयोजित केलेल्या शास्त्रीय सहगायनाच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत या कलाकारांच्या गायनाने उपस्थितांवर मोहिनी घातली. कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षा लता कित्तूर यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि स्मरणिका देऊन स्वागत केले. कलाकारांचा थोडक्मयात परिचय रोहिणी गणपुले यांनी करून दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सायंकालीन राग मुलतानीने झाली. त्यामध्ये ‘हा रे मन काहे को सोचकर’ हा विलंबित तीनतालातील ख्याल आणि आडा चौतालातील ‘कवन देस कवन नगरिया में’ द्रुत बंदिश कलाकारांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी ‘हिंडोल गावत सब’ ही एक रागमाला सादर केली. ही रागमाला एकतालात बांधलेली होती. मध्यंतराआधी दीपिका यांनी एक दादरा सादर केला. त्याचे बोल ‘कान्हा डार गयो मोपे रंग की गगरिया’ असे होते.
मध्यंतरानंतर ऋतुजा आणि दीपिका यांनी राग केदार सादर केला. मध्यलय झपतालातील ‘मालनिया सज रही हारवा’ ही बंदिश आणि त्यानंतर ‘नवेली नार’ ही द्रुत एकतालातील बंदिश सादर केली. केदारानंतर ऋतुजा लाड यांनी एक होरी सादर केली. तिचे शब्द होते ‘सकल बृज धूम मची हा रे’. कार्यक्रमाची सांगता विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांनी रचलेल्या ‘तुज पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी’ या भैरवीने झाली.
दोन्ही कलाकारांना महेश देसाई यांनी तबल्यावर आणि रवींद्र माने यांनी संवादिनीवर उत्कृष्ट साथ दिली. रोहिणी गणपुले यांनी आभार मानले.