ऋतुराजकडून एका षटकात 7 षटकारांसह 43 धावा, महाराष्ट्र विजयी
वृत्तसंस्था अहमदाबाद
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शानदार नाबाद द्विशतकाच्या जोरावर (220) महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात सलामीच्या ऋतुराज गायकवाडने 159 चेंडूत 16 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडत नाबाद 220 धावांची तुफानी खेळी केली. तसेच या सामन्यात त्याने एका षटकात 7 षटकारांसह 43 धावा झोडपत विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविला गेला. महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना जिंकून विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली आहे.
या सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी दिली. महाराष्ट्राने 50 षटकात 5 बाद 330 धावा जमविल्या. महाराष्ट्रातर्फे कर्णधार गायकवाडची खेळी अविस्मरणीय ठरली. संघाच्या 330 धावांमध्ये गायकवाडचा वाटा 220 धावांचा होता. गायकवाड आणि काझी यांनी चौथ्या गडय़ासाठी 146 धावांची भागीदारी केली. काझीने 42 चेंडूत 5 चौकारांसह 37 तर अंकित बावनेने 54 चेंडूत 5 चौकारांसह 37 धावा जमविल्या. बच्छावने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. त्रिपाठी 9 धावांवर बाद झाला. महाराष्ट्राच्या डावात 16 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. उत्तर प्रदेशतर्फे कार्तिक त्यागीने 66 धावात 3 तर रजपूत आणि शिवम शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना उत्तर प्रदेशचा डाव 47.4 षटकात 272 धावात आटोपला. त्यांचा सलामीचा फलंदाज आर्यन जुयलने 143 चेंडूत 3 षटकार आणि 18 चौकारांसह 159, शिवम शर्माने 41 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 33, प्रियम गर्गने 20 चेंडूत 2 चौकारांसह 22, कर्णधार कर्ण शर्माने 1 चौकारासह 13, रिंकू सिंगने 1 षटकारासह 11 धावा जमविल्या. महाराष्ट्रातर्फे राजवर्धन हंगिरगेकर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 53 धावात 5 तर बच्छाव आणि काझी यांनी प्रत्येकी 2 व मनोज इंगळेने 1 गडी बाद केला. उत्तर प्रदेशच्या डावात 5 षटकार आणि 26 चौकार नोंदविले गेले.
ऋतुराजचा विक्रम
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने डावातील 49 व्या षटकात 7 षटकारांसह 43 धावा झोडपल्या. उत्तर प्रदेशचा गोलंदाज शिवा सिंग याच्या या षटकात गायकवाडने तुफानी फटकेबाजी केली. या षटकामध्ये शिवा सिंगचा एक नोबॉलचा समावेश होता. यापूर्वी क्रिकेटच्या इतिहासामध्ये न्यूझीलंडच्या लि जर्मनने वेलिंग्टनमध्ये झालेल्या शेल करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात 8 षटकार नोंदविण्याचा विश्वविक्रम केला होता. 2018 साली झालेल्या फोर्ड चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात नॉर्दर्न डिस्ट्रीक्ट संघाकडून खेळताना ब्रेट हॅम्पटन आणि ज्यो कार्टर यांनी एकाच षटकात 43 धावा जमविण्याचा विश्वविक्रम केला होता. या विक्रमाशी ऋतुराज गायकवाडने बरोबरी केली. क्रिकेटमध्ये एका षटकात सलग 6 षटकार मारणाऱया फलंदाजांच्या यादीमध्ये विंडीजचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स, रवि शास्त्राr, हर्षल गिब्ज, युवराज सिंग, रॉस व्हिटले, हजरतुल्ला झझाई, लिओ कार्टर, केरॉन पोलार्ड, थिसारा परेरा यांचा समावेश आहे.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र 50 षटकात 5 बाद 330 (ऋतुराज गायकवाड नाबाद 220, बच्छाव 11, अंकित बावने 37, काझी 37, त्यागी 3-66, रजपूत 1-52, शिवम शर्मा 1-53), उत्तर प्रदेश 47.4 षटकात सर्वबाद 272 (आर्यन जुयल 159, शिवम शर्मा 33, गर्ग 22, कर्ण शर्मा 13, रिंकू सिंग 11, राजवर्धन हंगिरगेकर 5-53, बच्छाव 2-52, काझी 2-33, इंगळे 1-63).