भारतीय जेवणामध्ये विविधता व स्वाद आणण्यासाठी तोंडी लावण्याकरिता या लोणच्याचा उपयोग केला जातो. भूक वाढविण्यासाठी, अन्न चवदार लागण्यासाठी जेवणामध्ये त्याचा वापर केला जातो. भारतामध्ये विविध प्रांतात वेगवेगळय़ा प्रकाराच्या लोणच्यांचा वापर आवर्जुन केला जातो. घरामध्ये कोणी आजारी असेल तर तोंडाला चव येण्यासाठी लोणचे खाल्ले जाते. आता थंडीचे दिवस असल्याने बाजारामध्ये मोठय़ा प्रमाणात माईनमूळ, मिरच्या, लिंबू, आवळे, बीट, गाजर, आदींची आवक मोठय़ा प्रमाणात झाली आहे. यांचे लोणचे घालण्यामध्ये महिला मग्न आहेत. माईनमूळचे उत्पादन थंडीच्या दिवसांमध्ये येते. त्यामुळे ग्रामीण भागातून विक्रीसाठी माईनमूळ घेऊन महिला येत आहे.
माईनमूळ लोणचे
साहित्य. एक किलो माईन, एक वाटी मोहरी, दोन वाटय़ा बारीक मीठ, लिंबाचा रस एक वाटी, हिंग 10 ग्रॅम, मेथी 2 चमचे, एक चमचा हळद, मिरची पावडर 4 ते 5 चमचे, दोन वाटय़ा तेल, मोहरी दोन चमचे हे साहित्य लागते.
कृती- प्रथम माईनमूळे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याची साल काढून पुसून कोरडी करून घ्यावीत, नंतर त्याचे साधारण एक इंचाचे लांब व उभे चिरून तुकडे करावेत. आता माईनमुळाच्या तुकडय़ावर हिंग, मीठ, हळद, मिरचीपूड व लिंबूरस घालून चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर मेथी थोडय़ाशा तेलावर तांबूस रंगावर भाजून किंवा तळून घ्यावी. मोहरी डाळ जरा भाजून घेऊन मिक्सरला भरडसर वाटून घ्यावी. त्यानंतर तेल गरम करून त्यामध्ये हिंग व मोहरी घालून खमंग फोडणी करा. ती पूर्ण थंड झाल्यावर लोणच्यावर ओता व परत एकदा नीट हलवा मग लोणचे तयार झाले. त्यानंतर बरणीच्या तळाला थोडे मीठ घालून लोणचे भरून ठेवा. माईनमूळ बाजारामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत उपलब्ध असतात.
लिंबाचे लोणचे
साहित्यः 2 डझन लिंबे, मेथीदाणे सहा चमचे, एक वाटी तिखट, 10
ग्रॅम हिंग, एक चमचा साधा हिंग, हळद साधारण सहा चमचे, मीठ दोन वाटय़ा.
कृती- तिखट, मीठ, हिंग, हळद, मेथीपूडचे एकत्रित मिश्रण करावे. त्यानंतर लिंबाच्या फोडी करून घ्याव्यात. त्यानंतर स्वच्छ बरणीच्या तळाला 1 ते 2 वाटी मीठ नुसतेच घालावे. त्यावर लिंबाच्या फोडीचा एक थर घालून या फोडींवर तिखट, मीठ, हिंग, हळद, मेथीपूड मिश्रणाचा थर घ्यावा. असे सर्व थर तयार करून त्यावर 10 ते 12 लिंबांचा रस पिळावा. याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. त्याला हवा लागू नये, याची दक्षता घ्यावी. त्यानंतर बरणीत भरून 4 ते 5 महिने चांगले मुरण्यासाठी ठेवावे. एक महिना झाला की हलवावे. हे लोणचे भरपूर दिवस टिकते.
मिरचीचे लोणचे
साहित्य :हिरव्या मिरच्या पाव किलो, मेथी पावडर दीड चमचा, लाल तिखट एक वाटी, अंदाजे मीठ, एक वाटी तेल, हिंग, हळद, आर्धी वाटी मोहरी.
कृती : प्रथमत: मिरच्यांचे बारीक लांब तुकडे करावेत, या तुकडय़ांना मीठ व हिंग लावून साधारण एक तास ठेवावे. त्यानंतर मोहरी, मेथी पावडर, तिखट, तेल गरम करून थंड झाल्यावर त्यामध्ये ओतावे. हे सर्व मिश्रण एकत्रित करून चांगले मिक्स करावे. स्वच्छ बरणीत भरून ठेवावे. चार ते पाच विसांनी मुरल्यनंतर खाण्यास सुरुवात करावी. हे लोणचे वर्षभर टिकते.
मेकीनकाई लोणचे
साहित्य. एक किलो मेकीनकाई, आर्धी वाटी मोहरी, हिंग, तेल 10 चमचे, मीठ, हळद पावडर, आवश्यकतेनुसार तिखट, मेथीदाणे 4 चमचे.
कृती- मेकीनकाई स्वच्छ धुवून त्यामधील बिया काढाव्या, त्यानंतर त्याचा बारीक फोडी करून सुकण्यासाठी ठेवाव्यात, त्यानंतर मीठ, हळद पावडर, हिंग, मोहरी व मेथीदाणे मिक्सरला बारीक करून हे सर्व साहित्य त्या फोडींमध्ये घालून मिक्स करावे. स्वच्छ बरणीत भरून ठेवावे, एक आठवडय़ानंतर खायला सुरुवात करावी.
आवळय़ाचे लोणचे
साहित्यः एक किलो आवळे, आर्धी वाटी लाल तिखट, चार मोठे चमचे तेल, दोन चमचे मोहरी, एक चमचा हिंग, एक चमचा हळद, आवश्यकतेनुसार मीठ, साखर एक चमचा, मेथीदाणे चार चमचे.
कृती- प्रथमत: आवळे धुवून स्वच्छ पुसावेत, त्याचा पातळ कापटय़ा कराव्यात (साधारणत: एका आवळय़ामध्ये 10 ते 15 कापटय़ा), या फोडी एका काचेच्या भांडय़ात घेवून त्यात लोणचे मसाला, मीठ आणि लाल तिखट घालावे, दोन तास मसाला मुरु द्यावा, फोडणींमध्ये लाल तिखट, मेथी पावडर, मीठ, घालून एक तास भिजत ठेवावे. त्यानंतर तेल गरम करून त्यात मोहरी व हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. ही फोडणी एका वाटीत काढावी ती थंड झाल्यानंतर त्या फोडींवर घालून चांगले मिक्स करून काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बरणीत भरून ठेवावे. आवळय़ाचे शरीराला पौष्टिक आहे.
गाजर लोणचे
साहित्यः गाजर अर्धा किलो, 100 ग्रॅम मोहरी, हिंग, हळद, 5 ते 8 चमचे तेल, आवश्यकतेनुसार मीठ, चार ते पाच चमचे लाल तिखट.
कृती- प्रथमत: गाजर स्वच्छ धुवून पाणी निथळेपर्यंत थोडा वेळ ठेवावे. कापडाने पुसून घ्यावीत. त्यानंतर त्याचे एक इंच लांब अशा फोडी कराव्यात, मोहरी मिक्सरला बारीक करून घ्यावी. मोहरी, हिंग, मीठ, हळद, लाल तिखट, तेल त्या फोडींवर घालून चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ भरणीत भरून ठेवावे, हे लोणचे लगेच खाण्यासाठी तयार होते.
रेश्मा पाटील