ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सराव सामन्यात भारत अ संघाचे वर्चस्व : शुभमन गिलकडूनही यजमान संघाच्या गोलंदाजांचा समाचार
सिडनी / वृत्तसंस्था
ऋषभ पंत (73 चेंडूत नाबाद 103) व हनुमा विहारी (194 चेंडूत नाबाद 104) यांनी गुलाबी चेंडूने खेळवल्या जात असलेल्या सराव सामन्यात जोरदार फटकेबाजी करत पुढील आठवडय़ात आयोजित पहिल्या कसोटी सामन्यासाठी भक्कम दावेदारी सांगितली आहे. पंत व विहारी यांच्या शतकांमुळे भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध 4 बाद 384 धावांपर्यंत मजल मारली.
या लढतीत भारत अ संघाचा पहिला डाव 194 धावांवर आटोपला. पण, त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाचा पहिला डाव अवघ्या 108 धावांमध्येच खुर्दा झाला. त्यानंतर भारत अ संघाने 400 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचण्यात यश प्राप्त केले.
जॅक वाईल्डरमथ दुसऱया दिवसातील शेवटच्या षटकात गोलंदाजीला आला त्यावेळी पंतला शतक साजरे करण्यासाठी 19 धावांची गरज होती आणि त्याने 4, 4, 6, 4, 4 अशी तुफानी फटकेबाजी करत शतकाला अगदी थाटात गवसणी घातली. तो येथे फक्त 73 चेंडूतच 103 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीत एकूण 9 चौकार व 6 षटकारांचा समावेश राहिला.
दुसरीकडे, विहारीने देखील 194 चेंडूत 104 धावा फटकावल्या. पहिल्या कसोटीत निवडीसाठी मुख्य शर्यतीत असणारा आणखी एक खेळाडू शुभमन गिलने 78 चेंडूत 65 धावांचे योगदान दिले. त्याच्या अर्धशतकी खेळीत 10 चौकारांचा समावेश राहिला. दिवसभरातील शेवटच्या सत्रात पंतचा आक्रमक पवित्रा भारतीय संघाच्या पथ्यावरच पडला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील या लढतीत त्याने ऑस्ट्रेलिया अ संघाच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. भारतीय संघ या सराव सामन्यात आता 472 धावांनी आघाडीवर आहे.
पहिल्या डावात भारतीय संघाला अवघ्या 194 धावांवर समाधान मानावे लागले. पण, यजमान अ संघाला 108 धावांमध्येच गाशा गुंडाळावा लागल्याने या लढतीत भारत अ संघाचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यानंतर दुसऱया डावात पंत, विहारी व शुभमनच्या फटकेबाजीमुळे त्यांना आणखी भक्कम स्थिती प्राप्त करता आली. यात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी कसोटी स्पेशालिस्ट वृद्धिमान साहाशी शर्यतीत असलेल्या ऋषभ पंतची फटकेबाजी विशेष लक्षवेधी ठरली. त्याने काऊ कॉर्नरकडे उत्तूंग षटकार खेचल्यानंतर निक मॅडिन्सनला एससीजीच्या गॅलरीत जाऊन चेंडू शोधावा लागला.
शुभमन गिलने येथील फटकेबाजीसह सलामीची जागा जवळपास निश्चित केली असून हनुमा विहारीला अतिरिक्त फलंदाज म्हणून खेळवले जाऊ शकते.
शनिवारी दुसऱया दिवसाच्या खेळातील दुसऱयाच षटकात पृथ्वी शॉ बाद झाल्याने भारताला धक्का बसला. शुभमन गिलने मात्र 49 चेंडूत अर्धशतक झळकावत मिळालेल्या संधीचे पुरेपूर सोने केले. अर्थात, त्याचे बाद होणे मात्र नाटय़मय ठरले. लेगस्पिनर मिशेल स्वेप्सनच्या जलद आत आलेल्या चेंडूवर शुभमनचा फ्लिकचा फटका चुकला. प्रतिस्पर्धी संघाने यावेळी पायचीतसाठी अपील केले, दुसरीकडे, पहिल्या स्लीपमध्ये सीन ऍबॉटने झेलबादचे अपील केले. मुख्य पंचांनी बाद दिल्यानंतर सराव सामन्यात स्निकोमीटर व डीआरएस घेण्याची मुभा नसल्याचा भारताला फटका बसला.
रहाणे बाद झाल्यानंतर पंत फलंदाजीला उतरत असताना काही वेळ पावसाचा व्यत्यय आला. मात्र, त्यानंतर खेळाला सुरुवात झाली आणि पंतने आक्रमक फटकेबाजी सुरु केली. अगदी विहारीने देखील आक्रमण व बचावाचा उत्तम मिलाफ साधला.
संक्षिप्त धावफलक
भारत अ पहिला डाव : सर्वबाद 194. ऑस्ट्रेलिया अ पहिला डाव : सर्वबाद 108. भारत अ दुसरा डाव : 90 षटकात 4 बाद 386. (हनुमा विहारी 194 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 104, ऋषभ पंत 73 चेंडूत 9 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 103, शुभमन गिल 78 चेंडूत 10 चौकारांसह 65, मयांक अगरवाल 120 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 61, अजिंक्य रहाणे 38. मार्क स्टेकेटी 2-54, वाईल्डरमथ, स्वेप्सन प्रत्येकी 1 बळी).
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात हॅरिसला संधी
सिडनी : व्हिक्टोरियाचा मार्कस हॅरिसला शनिवारी भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यासाठी यजमान ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नर व विल पुकोवस्की हे दोन्ही फलंदाज पहिल्या कसोटीतून बाहेर फेकले गेल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही घोषणा केली. हॅरिसने ऑस्ट्रेलियातर्फे आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून गतवर्षी इंग्लंडमध्ये ऍशेस राखणाऱया संघात त्याचा समावेश होता.