प्रतिनिधी / कराड :
यश चोप्रा यांचा त्रिकोणी प्रेमकथा असणारा चांदणी हा चित्रपट 1989 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तिकीटबारीवर प्रचंड असे यश मिळवले. त्यावेळी अभिनेता ऋषी कपूर हा यशाच्या शिखरावर होता. या चित्रपटाच्या यशाने ऋषी कपूर यांचा बोलाबाला झालेला असताना कराडचे उद्योजक, मोरे आणि कंपनीचे मालक बापूसाहेब मोरे यांची लंडनमध्ये भेट झाली होती. आज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले, त्यानिमित्ताने बापूसाहेब मोरे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत या भेटीचा फोटो शेअर केला.
कराडचे माजी नगरसेवक असणाऱया बापूसाहेब मोरे यांच्या मोरे आणि कंपनीच्या कोल्हापूर आणि कराडला शाखा आहेत. प्रिंटींग व्यवसायात जागतिक पातळीवर होत असलेल्या तंत्रज्ञानातील माहितीचे प्रदर्शन ट्रेड फेअरमध्ये होत असते. या प्रदर्शनाला ते प्रत्येकवेळी भेटी देत असतात. 1990 सालचा मे महिना असेल. त्यावेळी लंडनमध्ये या प्रदर्शनाच्या निमित्ताने श्री. मोरे यांच्याबरोबर दिल्लीचे मित्र मिश्रा हेही गेले होते. ट्रेड फेअर आटोपून एक दिवस शॉपिंगसाठी ठेवलेला असताना त्यांना एका कॉफी शॉपजवळ ऋषी कपूर यांच्यासारखी व्यक्ती फिरताना दिसली. ते अभिनेते ऋषी कपूर असल्याची खात्री झाल्यानंतर मोरे यांनी दबकतच त्यांची भेट घेतली. मात्र भारतातील चाहते असल्याचे समजल्यावर कपूर यांनीच त्यांना आलिंगन दिले. मनमोकळेपणे त्यांनी गप्पा मारल्या. ट्रेड फेअरला आल्याचे समजताच ते खुश झाले.
ऋषी कपूर लंडनला शुटींगच्या निमित्ताने आले होते. त्यांना बाजारपेठेची माहिती होती. ती माहिती त्यांनी मोरे यांना दिली. शॉपची माहितीही दिली. भारतात प्रसिद्धीच्या आणि यशाच्या शिखरावर असणारा हा अभिनेता अतिशय सहजपणे आपल्याशी बोलत असल्याचा हा अनुभव मोरे आणि मिश्रा यांना अतिशय आनंद देणारा होता. या भेटीचे फोटोही त्यांनी काढले.
ऋषी कपूर यांच्या आठवणींचा हे फोटो बापूसाहेब मोरे यांनी गेली 30 वर्षे जपून ठेवले आहेत. आज सकाळी ऋषी कपूर यांच्या अकाली एक्झिटची बातमी आली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. ऋषी कपूर हे अतिशय ज्वाली आणि चतुरस्र अभिनेते होते. त्यांच्या भेटीचा तो प्रसंग आजही माझ्यासाठी ताजातवाना आहे, असे मोरे यांनी सांगितले.