वृत्तसंस्था/ बर्लिन
भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने डेन्मार्कचा विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन व जागतिक अग्रमानांकित व्हिक्टर ऍक्सेलसेनचा धक्कादायक पराभव करून जर्मन ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले.
या सामन्याच्या निर्णायक तिसऱया गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर जोरदार मुसंडी मारत लक्ष्यने ऍक्सेलसेनवर 21-13, 12-21, 22-20 अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. यापूर्वी या दोघांत पाचवेळा मुकाबला झाला होता. पण त्या प्रत्येकी वेळी ऍक्सेलसेनने विजय मिळविला होता. लक्ष्यचा हा त्याच्यावरील पहिलाच विजय आहे. 20 वर्षीय लक्ष्यने पहिला गेम 21-13 असा सहजपणे घेतला. पण दुसऱया गेममध्ये ऍक्सेलसेनने जबरदस्त खेळ करीत पुनरागमन केले आणि हा गेम 21-12 असा जिंकून सेनशी बरोबरी साधली. तिसऱया व निर्णायक गेममध्ये ऍक्सेलसेन एकवेळ 15-8 असे मोठय़ा फरकाने आणि नंतर 19-15 असे पुढे होता. पण लक्ष्यने झुंजार खेळ करीत हा गेम 22-20 असा घेत ऍक्सेलसेनचे आव्हान संपुष्टात आणले. जेतेपदासाठी त्याची लढत थायलंडच्या कुनलावत वितिदसमशी होणार आहे.