वृत्तसंस्था/ जेद्दाह
स्पॅनिश सुपरचषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी येथे झालेल्या थरारक उपांत्यफेरीच्या सामन्यात ऍटलेटिको माद्रिदने बलाढय़ बार्सिलोनाचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता या स्पर्धेत ऍटलेटिका माद्रिद आणि रियल माद्रिद यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
बार्सिलोना आणि ऍटलेटिको माद्रिद यांच्यातील सामन्यात बार्सिलोनाने 80 मिनिटांपर्यंत ऍटलेटिकोवर 2-1 अशी आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर शेवटच्या 9 मिनिटात ऍटलेटिकोने 2 गोल नोंदवून बार्सिलोनाचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यातील सर्व म्हणजे पाच गोल खेळाच्या उत्तरार्धात नोंदविले गेले. बार्सिलोनातर्फे लायोनेल मेस्सी आणि ग्रिझमन यांनी प्रत्येकी 1 गोल केला. ऍटलेटिको माद्रिदतर्फे कोके, मोराटा आणि कोरिया यांनी प्रत्येकी 1 गोल केला.