प्रतिनिधी/ पणजी
माघ शुद्ध षष्टीच्या शुभमुहूर्तावर पांगम कुलबंधूंचा वार्षिक समराधना उत्सव कुलदेवी श्री सातेरी चरणी पावशी (ता. कुडाळ) येथे मोठय़ा थाटामाटात झाला. अनेक ठिकाणी स्थायिक झालेले पांगम कुलबंधूं या उत्सवास उपस्थित होते.
या उत्सवाचे औचित्य साधून गोव्याच्या ऍडव्होकेट जनरलपदी नियुक्ती झाल्याबद्दल ऍड. देविदास पांगम यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. निवृत्त पोलीस अधीक्षक उमेश पांगम यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र प्रदान करण्यात आले.
कुणीही यशाने हुरळून न जाता प्रयत्नपूर्वक पुढचे मैलांचे दगड पादाक्रांत करून जीवनात अधिक अधिक पल्ला गाठला पाहिजे, असे प्रतिपादन ऍड. देविदास पांगम यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी कुलदेवतेचे महत्त्व विषद करून सर्वांनी कुलदेवतेच्या चरणी भक्तीने लीन व्हावे जेणेकरून अंगी सात्विकता येऊन जीवनातील यशास उभारी मिळेल, असे ते शेवटी म्हणाले.
ऍड. विलास पांगम यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन त्यांनीच केले. पांगम कुलोत्त्पन्न उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश पांगम अध्यक्षस्थानी होते. तसेच इतरही पदाधिकारी व्यासपीठावर होते.
पांगम कुलोत्त्पन्न उत्कर्ष प्रतिष्ठानच्या ‘पुरीश भवन’ या सभागृहात हा कार्यक्रम झाला.