कोविड-19 च्या रुग्णांना नोवेल अँटीबॉडी देण्यात आल्यास त्यांना सामान्य पद्धतीने उपचार घेणाऱया रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयांमध्ये दाखल करणे किंवा आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरविण्याची कमी गरज भासत असल्याचे आढळून आले आहे. एका नव्या अध्ययनात हा दावा करण्यात आला आहे.
सद्यकाळात सुरू असलेल्या दुसऱया टप्प्यातील वैद्यकीय परीक्षणाचे अंतिम निष्कर्ष न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. यांतर्गत ‘एलवाय-सीओवी 555 (संक्रमणमुक्त झालेल्या कोविड-19 रुग्णांच्या रक्तातून प्राप्त मोनोक्लोनल अँटीबॉडी)च्या तीन विविध डोसची चाचणी करण्यात आली आहे.
अध्ययनादरम्यान प्राप्त आकडेवारीच्या विश्लेषणातून 2,800 मिलिग्रॅम अँटीबॉडी सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या कोविड-19 च्या रुग्णाला दिल्यास त्याच्या शरीरात विषाणूचा प्रभाव कमी होतो आणि याचबरोबर रुग्णालयत दाखल करणे आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवेची गरज कमी होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेतील सीडर-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये कार्यरत आणि संशोधनपत्राचे सह-लेखक पीटर चेन यांनी कोविड-19 बाधिताची रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी होणे हा सर्वात महत्त्वपूर्ण शोध असल्याचे नमूद केले आहे.
मोनोक्लोनल अँटीबॉडीमध्ये कोविड-19च्या रुग्णांमध्ये संक्रमणाची तीव्रता कमी करण्याची क्षमता असून यामुळे बहुतांश लोक स्वतःच्या घरीच या रोगातून बरे होऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. एलवाय-सीओवी555 विषाणूच्या स्पाइक नावाच्या प्रोटीनशी जोडले जाते, विषाणूला याची मानवी शरीरात प्रवेश करण्यासाठी गरज भासते. अँटीबॉडी विषाणूची स्वतःची प्रतिकृती निर्माण करण्याची क्षमता कमकुवत करते, यामुळे रुग्णाला या संक्रमणाच्या विरोधात प्रतिकारक क्षमता विकसित करण्यासाठी वेळ मिळतो. अँटीबॉडीद्वारे विषाणूला प्रारंभिक टप्प्यात नुकसान पोहोचविण्यापासून रोखू शकतो असे चेन म्हणाले. अध्ययनानुसार संशोधनात 300 रुग्णांना सामील करण्यात आले होते. यातील 100 रुग्णांना अँटीबॉडी देण्यात आली, तर सुमारे 150 रुग्णांना प्रायोगिक औषध देण्यात आले.