जुने गोवे येथील बेकायदा बांधकाम प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
जुने गोवे येथील वारसास्थळी चाललेल्या बेकायदा बांधकामाला दिलेले सर्व परवाने रद्द करावे, अशी मागणी ऍड. अमित पालेकर यांनी केली आहे. या बांधकामाला विरोध करण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मेरशी येथील आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. जुने गोवेतील सदर बेकायदा बांधकाम सुरु झाल्यापासून मंत्री आणि आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्र्यासह प्रत्येकजण वेगवेगळी विधाने करत असून राजकारण्यांनी जनतेची थट्टा चालवली आहे, असे सांगून पालेकर यांनी संताप व्यक्त केला.
त्यामुळे जो पर्यत हा प्रकल्प आणि त्याला दिलेले परवाने रद्द केल्याचे सरकार जाहीर करत नाही, तसेच प्रकल्प जमीनदोस्त करण्यासंबंधी ठोस निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे पालेकर यांनी सांगितले. आज सकाळी ते जुने गोवे चर्च परिसरात उपोषण प्रारंभ करणार आहेत.
आमदार विजय सरदेसाई आणि त्यांच्या सचिवानी या बांधकामाला परवानगी दिली असल्याचा अप्रत्यक्ष आरोप मुख्यमंत्री सावंत यांनी केला आहे. तसेच या बांधकामासंबंधी कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले आहे. असे असले तरी अशा बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार राज्य सरकारला असतात याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला असावा, असे पालेकर म्हणाले.
हा माझ्यासाठी भावनिक मुद्दा आहे आहे प्रत्येक राजकरण्यानी गोवा विकायला काढले आहे हे थांबणे आणि भावी पिढीसाठी गोयकारपण राखायला आज पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मुंबईतील भाजप कार्यकर्ता असलेल्या फॅशन डिझायनरने या बंगल्याचे बांधकाम आरंभले आहे. जुने गोवेतील वारसा परिसरात चाललेल्या या बांधकामाकडे सरकारने जाणीवपूर्वक चालविलेली डोळेझाक आणि कारवाईतील निक्रियतेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली असून राज्यात अनेक भागात नागरिक सध्या उपोषण करत आहेत. या सर्वांना आमचा पूर्ण पाठिंबा असून त्यासाठीच आपण आमरण उपोषणाचा निर्णयही घेतला, असे पालेकर यांनी पुढे सांगितले.