जपान ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संसदीय पॅनेलची शिफारस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2021 जपान ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय ऍथलिट, प्रशिक्षक व सहायक पथकातील सदस्यांना सर्वप्रथम कोरोना लस दिली जावी, अशी शिफारस संसदीय समितीने गुरुवारी केली. सध्या विविध खेळातील प्रशिक्षकपदे रिक्त आहेत. त्यावर गांभीर्याने विचार करावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे. नव्या रुपरेषेनुसार, पुढील वर्षी जुलैमध्ये जपान ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न होणे अपेक्षित आहे.
अद्याप प्रशिक्षण सुविधा, स्टेडियम व क्रीडा केंद्रे सुरु झालेली नाहीत. त्यामुळे, ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या भारतीय खेळाडूंना पूर्ण क्षमतेने सरावही सुरु करता आलेला नाही. त्यामुळे, ही अडचण ओळखून सर्वप्रथम शक्य तितक्या लवकर प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे सदर संसदीय समितीने म्हटले आहे.
शिक्षण, महिला, मुले, युवा व क्रीडा विभागाशी संलग्न संसदीय समितीचे नेतृत्व भूषवणाऱया विनय सहस्त्रबुद्धे यांनी 2021 ऑलिम्पिक तयारी या विषयावरील अहवाल राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडे ऑनलाईन सुपूर्द केला. त्यात सदर सूचना व शिफारशी करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कर्मचारी, तसेच एक्स-रे, एमआरआय मशिनसारखी साधने भारतातील निवडक क्रीडा प्राधिकरणे व क्रीडा केंद्रांवर उपलब्ध करुन द्यावीत, असे या अहवालात नमूद आहे.
‘वैद्यकीय तज्ञ व आवश्यक साधने केंद्रावरच असतील तर खेळाडूंना अधिक वेळ घालवावा लागणार नाही. इस्पितळात जाताना कोव्हिड-19 चा संसर्ग होण्याचा धोका असतो, तो ही यामुळे टाळता येईल. अर्थात, स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी करावा लागणार प्रवास ही खेळाडूंसाठी आताही डोकेदुखी आहे’, असे या अहवालात नमूद आहे.
भारताने मायभूमीत अधिक स्पर्धा आयोजित केल्या तर यावर काही प्रमाणात मार्ग काढता येईल, याचाही त्यांनी उल्लेख केला.
कोव्हिड-19 मुळे बरेच विदेशी प्रशिक्षक आपल्या पदाचा राजीनामा देऊन मायदेशी परतले आहेत तर 65 वर्षांवरील प्रशिक्षकांना विविध संघटनांनीच थांबवले आहे. या पार्श्वभूमीवर, साधारणपणे 561 प्रशिक्षकपदे रिक्त आहेत, हे गंभीर आहे. त्यामुळे, तातडीने ही पदे भरावीत, जेणेकरुन ऑलिम्पिक तयारीला धक्का बसणार नाही, असे या अहवालात पुढे नमूद आहे.