वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ऍथलेटिक्स क्षेत्रातील ऍथलीटस् आता सोमवारपासून आऊटडोअर प्रशिक्षणाला प्रारंभ करणार आहेत. कोरोना महामारी संकटामुळे तब्बल दोन महिने ऍथलीटस्ना आपल्या घरातच राहावे लागले होते.
सोमवारपासून सुरू होणाऱया ऍथलीटस्च्या आऊटडोअर प्रशिक्षणामध्ये प्रारंभी शारीरिक तंदुरूस्तीसाठी ते व्यायाम करतील. ते या सरावामध्ये शारीरिक व्यायाम घेताना दुखापत होवू नये याची काळजी घेतील. भारतातील पतियाळा, बेंगळूर आणि उटी येथील भारतीय क्रीडा प्राधीकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये सोमवारपासून ऍथलीटस् सरावाला प्रारंभ करणार असल्याचे अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष अदिली सुमरीवाला यांनी सांगितले. भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये भारताची अव्वल महिला धावपटू दुती चंदने आऊटडोअर सरावाला ओडिशा शासनाच्या परवानगीने प्रारंभ केला आहे. ओडिशा राज्यातील लॉकडाऊन नियमामध्ये काही शिथिलता करण्यात आली आहे. भारतातील ऍथलेटिक्स हंगाम 12 सप्टेंबरपासून सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.