देशातील सर्वात लांब रेल्वेगाडी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना काळात अद्याप नियमित रेल्वेंचे संचालन बंद आहे. पण रेल्वेने याचा लाभ घेत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. याचनुसार रेल्वेने एक नवा विक्रम नोंदवून 295 डबे आणि 5 इंजिन असलेली 3.5 किलोमीटर लांबीची वासुकी रेल्वे यशस्वीपणे चालविण्यास यश प्राप्त केले आहे. ही आतापर्यंतची सर्वात लांब रेल्वेगाडी असून ती छत्तीसगडच्या भिलाईपासून कोरबापर्यंत धावली आहे.
3.5 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेला खेचण्यासाठी 5 इंजिन्स जोडण्यात आले होते. 5 इंजिनांदरम्यान उत्तम ताळमेळ ठेवण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉनिक सिग्नलने जोडण्यात आले आहे. रेल्वेच्या या प्रयत्नांमुळे कमी कालावधीत अधिक मालवाहतूक करण्यास मदत मिळणार आहे. कमी वेळ, कमी खर्च, अधिक सुविधा आणि उत्तम सुरक्षेमुळे भारतीय रेल्वे देशात मालवाहतुकीचा पसंतीचा पर्याय ठरत आहे.
कोण होते वासुकी?
हिंदू पौराणिक कथांनुसार वासुकी हे भगवान शिव यांचे परमभक्त होते. नाग प्रजातीच्या लोकांनीच सर्वप्रथम शिवलिंगाच्या पूजेचे प्रचलन सुरू केल्याचे मानले जाते. नागराज वासुकी यांना नागलोकाचा राजा मानले गेले आहे. समुद्रमंथनादरम्यान वासुकी नागाचाच अवलंब करण्यात आल्याचे म्हटले जाते.
यापूर्वी शेषनाग, ऍनाकोंडा रेल्वेने यापूर्वी भारतात सर्वाधिक लांबीची रेल्वेगाडी शेषनागाच्या नावावर चालविली होती. चार रेल्वेगाडय़ांना जोडून ती चालविण्यात आली होती. शेषनागपूर्वी तीन रेल्वेंना जोडून ऍनाकोंडा रेल्वे चालविली गेली होती. मालगाडीसाठी स्वतंत्र समर्पित मार्गिका तयार करण्यात आली आहे.