वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपलने साखळी पुरवठय़ाच्या माध्यमातून भारतात 20 हजार जणांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. डिजिटाइम्स एशियाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
भारतात ऍपलच्या विविध उत्पादनांना चांगली मागणी आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत उत्पादने व्यवस्थित पोहचवण्यासाठी पुरवठा साखळी महत्त्वाची भूमिका बजावत असते. कोणत्याही व्यवसायाच्या विस्तारात पुरवठा साखळी फार महत्त्वाची मानली जातो. एखाद्या गोष्टीची मागणी झाल्यावर ती व्यवस्थित इच्छितापर्यंत योग्यपणे पोहचवण्याची व्यवस्था पुरवठा साखळीतंर्गत पार पाडली जात आहे. कोरोनाची महामारी नसती तर जास्त जणांना नोकरीची संधी प्राप्त झाली असती, असेही डिजिटाइम्स एशियाने म्हटले आहे.
उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेचा लाभ उठवत फॉक्सकॉन, विस्ट्रॉन व पीगट्रॉन यांनीही भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याविषयी योजना आखली आहे. मार्च 2022 पर्यंत भारतात फॉक्सकॉन व विस्ट्रॉन यांच्याकडून प्रत्येकी 23 हजार जणांची भरती केली जाणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे पीगट्रॉननेही मार्च 2022 पर्यंत 6 ते 7 हजार जणांना रोजगार मिळवून देण्याची तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे. भारतात पर्यावरण मैत्रीयुक्त उत्पादनाअंतर्गत आयफोन 12 स्मार्टफोन निर्मितीसाठी ऍपल कंपनी प्रयत्न करणार आहे.