विविध कामगार युनियनच्या तक्रारीनंतर नियमात केला बदल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या काळात ऍमेझॉन कंपनीने वर्क फ्रॉम होम सुविधा येत्या 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा केली आहे. असे कर्मचारी आता कार्यालयात न येताही नियमितपणे घरातून काम करु शकणार आहेत. हा नियम जागतिक पातळीवर ऍमेझॉनमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना लागू होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
या अगोदर सदरची सुविधा ही जानेवारी 2021 पर्यंत लागू केली होती. मागील काही दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये कंपनीचे जवळपास 19 हजार कामगार हे कोरोना संकटात सापडले होते. अमेरिकेत या घटनेची दखल घेत काही युनियन आणि नेत्यांनी ऍमेझॉनवर आरोपांचा भडीमार केल्यानंतर हा नवा बदल केला असल्याची माहिती आहे.
सुरक्षेची तगडी व्यवस्था
आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन ऍमेझॉनने केले आहे. ज्यांना कार्यालयात येणे गरजेचे आहे, त्यांची उपस्थिती यापुढेही राहणार असून कार्यालयात कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचे ऍमेझॉनकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.