वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍमेझॉन इंडियानंतर आता फ्लिपकार्टनेही ई फार्मसी प्लॅटफॉर्म सुरु करण्याची योजना आखलेली आहे. यासंदर्भातील माहिती नुकतीच देण्यात आली आहे की, फ्लिपकार्ट आता ऑनलाईन औषध डिलिव्हरी करण्याचा विचार करत असल्याची माहिती असून यासाठी एक टीम तयार केली जात असल्याचीही माहिती आहे.
सदर योजना आखताना फ्लिपकार्ट मुंबईतील ऑनलाईन फार्मसीसोबत व्यवहार करणार आहे. यात फार्मईजीसोबत हात मिळवणी करण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. तसेच फार्मईजी ही बेंगळूरच्या मेडलाईनसोबतही अधिग्रहण करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
फार्मईजी फाउंडिंग टीमसोबत बैठका सुरु असून यात कोणासोबतही काम करण्यास मिळाल्यास त्यातून योग्य तो मार्ग काढण्यावर विचार केला जाणार असल्याचे फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ति यांनी म्हटले आहे. कारण ऑनलाईन औषध विक्रीच्या व्यवसायात उतरण्याअगोदर त्याच्याशी संबंधीत असणाऱया कायदेशीर बाबी पडताळून पाहणे तितकेच महत्वाचे असल्याचे स्पष्टीकरण यावेळी फ्लिपकार्टकडून देण्यात आले आहे.