वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ई-कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणारी प्रमुख कंपनी ऍमेझॉनवर प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) नीति आणि परकीय चलन विनिमय कायदा (फेमा) यांचे उल्लंघन केल्याचा आरोप व्यापारी संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) यांनी केला आहे. ऍमेझॉन भारतामध्ये मल्टी नॅशनल रिटेल ऍक्टिविटीजच्या संचलनावर सरकारकडून योग्य ती मंजुरी घेतली नसल्याचे कॅटने म्हटले आहे.
सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध असणाऱया दस्तावेजच्या आधारे ऍमेझॉन इंडियामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. जी ई-कॉमर्स मार्केटप्लेस असल्याचेही कॅटचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी स्पष्ट केले आहे. ऍमेझॉनने फ्यूचर कूपन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 1,430 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फ्यूचर रिटेल लिमिटेडमध्ये सदरची सर्व गुंतवणूक फेमा नियमाचे उल्लंघन करणारी असल्याचे महासचिवांनी नमूद केले आहे.