वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये इलेक्ट्रीक गाडय़ांच्या वापरामध्ये तेजी दिसून आली आहे. ही बाब लक्षात घेऊन ऍमेझॉन इंडियाने महिंद्रा इलेक्ट्रीक यांच्यासोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. या भागिदारीअंतर्गत ऍमेझॉन इंडिया महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रीकच्या गाडय़ा वस्तुंच्या पुरवठय़ासाठी वापरणार आहे. या अंतर्गत ऍमेझॉनने अंदाजे 100 महिंद्रा ट्रीओ झोर इलेक्ट्रीक वाहनांचा देशातील सात प्रमुख शहरांमध्ये वापर करण्याचा इरादा पक्का केला आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या माध्यमातून ऍमेझॉन आपल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवणार आहे. बेंगळूर, नवी दिल्ली, हैद्राबाद व अन्य शहरांमध्ये सुरुवातीला सेवा दिली जाणार आहे.
मागच्या वर्षी अमेझॉन इंडियाने अंदाजे 10 हजार इलेक्ट्रीक गाडय़ांचा समावेश करणार असल्याची घोषणा केली होती. या अंतर्गत 2025 पर्यंत दहा हजार गाडय़ा घेण्याचे उद्दिष्ट साकारले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
फ्लिपकार्टकडूनही इलेक्ट्रीक गाडय़ांचा वापर
दुसरीकडे ई-कॉमर्स क्षेत्रातील आणखी एक दिग्गज कंपनी फ्लिपकार्टनेदखील वस्तुंच्या पुरवठय़ासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला आहे. मागच्यावर्षी यासंबंधिची घोषणा फ्लिपकार्टनेही केली होती. 2030 पर्यंत विविध वस्तुंच्या डिलिव्हरीसाठी पूर्णपणे इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करण्याचा संकल्प फ्लिपकार्टने केला आहे.