अन्टय़ाला : ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनॉरने येथील एटीपी स्पर्धेचे जेतेपद पटकावत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमची चांगली तयारी केली आहे. अन्टय़ाला ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सात मिनिटांचा खेळ झाल्यानंतर कझाकच्या अलेक्झांडर बुबलिकने घोटय़ाच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याने त्याला हे जेतेपद मिळाले. अंतिम सामना सुरू झाल्यानंतर दोन गेम्स झाले होते आणि दोन्ही गेम्स डी मिनॉरने जिंकले होते. यावेळीच बुबलिकने माघार घेतली. तुर्कीमधील या एटीपी 250 स्पर्धेतील जेतेपदामुळे पुढील महिन्यात होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमसाठी संजीवनीच मिळाली आहे, असे तो म्हणाला.
मागील वर्षी पोटाचे स्नायू दुखावल्याने त्याला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममध्ये भाग घेता आले नव्हते. मंगळवारी जेरेमी चार्डीविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीवेळी बुबलिकच्या घोटय़ाला दुखापत झाली होती.