इंग्लंडसमोर उरलीसुरली पत राखण्याचे आव्हान, इंग्लंडतर्फे अद्याप एकही शतक वा 5 बळी नाही
सिडनी / वृत्तसंस्था
ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यासाठी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) उतरताना इंग्लिश संघासमोर उरलीसुरली पतप्रतिष्ठा राखणे, हेच एकमेव लक्ष्य असेल. इंग्लिश खेळाडूंना या मालिकेत आतापर्यंत एकही शतक झळकावता आलेले नाही आणि त्याचप्रमाणे एकदाही डावात 5 बळीही घेता आलेले नाहीत. भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहिल्या दिवसाच्या खेळाला पहाटे 5 वाजता सुरुवात होईल.
या सामन्यात शुक्रवारी तिसऱया दिवसाच्या खेळादिवशीच इंग्लंडने विदेशी भूमीत शेवटची कसोटी जिंकून 11 वर्षांचा कालावधी पूर्ण होईल. ऍन्डय़्रू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने त्यावेळी एक डाव व 83 धावांनी जिगरबाज विजय संपादन केला होता. त्यावेळी मैदानात उपस्थित 19 हजार इंग्लिश चाहत्यांनी थाटात विजय साजरा केला होता. त्यानंतर खेळलेल्या 13 कसोटी सामन्यात इंग्लंडला केवळ एकच सामना अनिर्णीत राखता आला आहे. सिडनीतील शेवटच्या 2 कसोटीत तर त्यांचा एकतर्फी धुव्वा उडाला आहे.
ऑस्ट्रेलियाने या मालिकेत यापूर्वीच 3-0 अशा फरकाने विजयी आघाडी घेतली असून पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याचेच त्यांचे प्रयत्न असतील. त्यांनी आपल्या संघात उस्मान ख्वाजाला स्थान दिले आहे. पण, येथेही इंग्लिश संघाने निराशाजनक कामगिरी केली तर मालिकेतील उरसुरले औत्सुकही कमी होण्याची शक्यता असेल. एकीकडे, इंग्लिश संघ अडचणीत असताना मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे. स्टुअर्ट ब्रॉडला गोलंदाजी लाईनअपमध्ये पाचारण करत त्याच्यावरच आता इंग्लिश संघाची भिस्त असणार आहे.
संभाव्य संघ
ऑस्ट्रेलिया ः पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, कॅमेरुन ग्रीन, ऍलेक्स कॅरे, मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
इंग्लंड ः जो रुट (कर्णधार), हसीब हमीद, झॅक क्रॉली, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मार्क वूड, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः पहाटे 5 वा.