ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज स्कॉट बोलँडला पदार्पणाची संधी
मेलबर्न / वृत्तसंस्था
आजपासून (रविवार दि. 26) येथील एमसीजी मैदानावर खेळवल्या जाणाऱया तिसऱया ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध जलद गोलंदाज स्कॉट बोलँडला पदार्पणाची संधी देणे अपेक्षित आहे. इंग्लिश संघाने या लढतीसाठी 4 फेरबदल केले. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहिल्या दिवसाच्या खेळाला पहाटे 5 वाजता प्रारंभ होईल.
बोलँडला यापूर्वी राखीव खेळाडू म्हणून निवडले गेले. त्यानंतर सहकारी जलद गोलंदाज झाय रिचर्डसन व मायकल नेसर स्नायूच्या वेदनेमुळे खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आणि बोलँडचे पदार्पण निश्चित झाले. जोश हॅझलवूड अद्याप दुखापतीतून सावरत असल्याने तो खेळणार नाही. कोरोनाग्रस्ताच्या थेट संपर्कात आल्याने ऍडलेड कसोटीत खेळू न शकलेला पॅट कमिन्स येथे नेतृत्वाची धुरा सांभाळेल. ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेत तूर्तास 2-0 फरकाने आघाडीवर असून एमसीजीवरच मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
ब्रॉड, रोरी बर्न्सला इंग्लंडचा डच्चू
दुसरीकडे, पाहुण्या इंग्लिश संघाने सलामीवीर रोरी बर्न्स व अनुभवी जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडसह ऑलि पोप व ख्रिस वोक्स यांनाही या लढतीतून डच्चू दिला आहे. गोलंदाज मार्क वूड व जॅक लीच संघात पुनरागमन करतील तर झॅक क्रॉली व जोनाथन बेअरस्टो या मालिकेतील आपली पहिली कसोटी खेळणार आहेत. जोस बटलरच यष्टीरक्षक करेल, असे इंग्लंडने स्पष्ट केले आहे.
‘आम्ही येथे केवळ सहभागासाठी आलो आणि 70 हजार लोकांनी ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका विजयाचा आनंद साजरा करावा, असे अजिबात नाही. विजयाचा दुष्काळ येथे संपुष्टात आणणे हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल’, असे जोस बटलर याप्रसंगी म्हणाला.
संभाव्य संघ
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड, कॅमेरुन ग्रीन, ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
इंग्लंड ः जो रुट (कर्णधार), हसीब हमीद, झॅक क्रॉली, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, जोनाथन बेअरस्टो, जोस बटलर, मार्क वूड, ऑलि रॉबिन्सन, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः पहाटे 5 वा.
थेट प्रक्षेपण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क