वृत्तसंस्था/ लंडन
ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱया आगामी ऍशेस क्रिकेट मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने रविवारी येथे 17 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. दुखापतीमुळे अष्टपैलू बेन स्टोक्स आणि सॅम करेन हे या मालिकेत खेळू शकणार नाहीत. इंग्लंड संघात स्टुअर्ट ब्रॉडचा समावेश करण्यात आला आहे.
भारताविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत स्नायू दुखापतीमुळे स्टुअर्ट ब्रॉडला वगळण्यात आले होते. आता तो पूर्ण तंदुरूस्त झाल्याने ऍशेस मालिकेसाठी त्याची इंंग्लंड संघात निवड करण्यात आली आहे.
अष्टपैलू बेन स्टोक्स मानसिक अस्वास्थामुळे अनिश्चित कालावधीकरिता ब्रेकवर असून तो या मालिकेतही खेळणार नाही. त्याने यापूर्वीच क्रिकेटपासून काही दिवसांसाठी आपण दूर राहणार असल्याचा निर्णय इंग्लंडच्या निवड समितीला कळविला होता.
निवड समितीने सॅम करणला पाठ दुखापतीमुळे वगळले आहे. ऍशेस मालिकेसाठी घोषित 17 जणांच्या इंग्लंड संघामध्ये एकाही नव्या चेहऱयाचा समावेश नाही. क्रॉले आणि फिरकी गोलंदाज डॉम बेसचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज आर्चर आणि ओली स्टोन यांना वगळण्यात आले आहे.
कोरोना महामारी नियमानुसार इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर 14 दिवसांसाठी हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. ऍशेस मालिकेतील पहिली कसोटी ब्रिस्बेन येथे 8 डिसेंबरपासून खेळविली जाईल. या मालिकेतील ऍडलेडची 16 डिसेंबरपासून सुरू होणारी दुसरी कसोटी दिवस-रात्रीची राहील. मेलबोर्नमध्ये तिसरी कसोटी बॉक्सिंग डे दिवशी सुरू होईल. या मालिकेतील चौथी कसोटी सिडनीमध्ये आणि पाचवी कसोटी पर्थमध्ये होईल. 14 जानेवारीला पर्थमधील शेवटच्या कसोटीला प्रारंभ होईल. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी ऍशेस स्वतःकडे राखले आहे. 2019 साली ऍशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली होती.
इंग्लंड संघ- जो रूट (कर्णधार), अँडरसन, बेअरस्टो, बेस, स्टुअर्ट ब्रॉड, बर्न्स, बटलर, क्रॉले, हसीब हमीद, लॉरेन्स, लिच, मॅलेन, ओव्हरटन, ऑली पॉप, रॉबिनसन, वोक्स आणि मार्क वूड.