महिला एकेरीच्या अंतिम लढतीत अमेरिकेच्या डॅनिले कॉलिन्सवर सरळ सेट्समध्ये विजय
मेलबर्न / वृत्तसंस्था
यजमान ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीचे जेतेपद संपादन करत शनिवारी नवा इतिहास रचला. बार्टीने या विजयासह ऑस्ट्रेलियाचा सदर इव्हेंटमधील 44 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आला. तिने अंतिम फेरीत अमेरिकेच्या डॅनिली कॉलिन्सला 6-3, 7-6 (2) अशा फरकाने नमवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तिच्यासाठी वैयक्तिक कारकिर्दीतील हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले.
बार्टी 1978 नंतर हा इव्हेंट जिंकणारी पहिली ऑस्ट्रेलियन ठरली. 1978 मध्ये ख्रिस ओनिलने यापूर्वी महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाची पाटी कोरीच राहिली होती. योगायोग म्हणजे, बार्टीने ऐतिहासिक जेतेपदावर शिक्कामोर्तब केले, त्यावेळी दस्तुरखुद्द ख्रिस ओनील व्हीआयपी गॅलरीमध्ये जातीने हजर होती.
रॉड लेव्हर एरेनाच्या फ्लडलाईट्सवर बार्टीने एकापेक्षा एक सरस मैदानी फटके लगावत ब्रेक पॉईंट वसूल केले आणि कॉलिन्सवर पहिल्या टप्प्यापासूनच दडपण राखले. कॉलिन्सने दोन्ही सेट्समध्ये संघर्ष केला. यातील दुसऱया सेटमध्ये तर तिने आणखी तोडीस तोड लढत दिली. पण, पहिला सेट सहज जिंकणाऱया बार्टीने दुसऱया सेटमध्येही अंतिम क्षणी बाजी मारण्यात यश प्राप्त केले. कॉलिन्सकडून झालेले डबल फॉल्ट्स बार्टीच्या पथ्यावर पडणे साहजिक होते.
फायनल लढतीतील पहिल्या सेटमध्ये बार्टीने 6-3 असा सहज विजय संपादन केला आणि या सेट जिंकण्यासाठी तिला फारसे प्रयास देखील करावे लागले नाहीत. त्या तुलनेत दुसऱया सेटमध्ये मात्र बार्टीला अपेक्षेपेक्षा अधिक झगडावे लागले.
दुसऱया सेटमध्ये बार्टीचे फोरहँडचे फटके प्रभावी बसत नव्हते आणि याचा लाभ घेण्याची कॉलिन्सची रणनीती होती. एकवेळ तर कॉलिन्स 3-0 अशा एकतर्फी आघाडीवर देखील होती. नंतर तिने बार्टीवर दडपण आणत आपली आघाडी 5-1 पर्यंत आणली. येथे सामन्यात बरोबरी निर्माण होईल आणि निर्णायक तिसऱया सेटमध्ये उभयतांना झुंजावे लागेल, अशीच चिन्हे होती. पण, याचवेळी अचानक बार्टीने मुसंडी मारण्यास सुरुवात केली आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब करत तिने आपल्या आक्रमक मोहिमेची यशस्वी सांगता केली. बार्टीचा टायब्रेकमधील जोरकस खेळ विशेष लक्षवेधी ठरला.
पुरुष एकेरीतील जेतेपदासाठी आज नदाल-मेदवेदेव्ह आमनेसामने
यंदाच्या ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरी जेतेपदासाठी आज स्पेनचा राफेल नदाल व रशियाचा डॅनिएल मेदवेदेव्ह आमनेसामने भिडणार आहेत. 2009 मध्ये चॅम्पियनशिप मिळवणाऱया नदालचे येथे दुसऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जेतेपदाचे प्रयत्न असणार आहेत. सध्या नदाल पारंपरिक प्रतिस्पर्धी नोव्हॅक जोकोविच व रॉजर फेडरर यांच्यासह 21 ग्रँडस्लॅम विजयासह बरोबरीत असून सर्वाधिक ग्रँडस्लॅमच्या निकषावर निर्विवाद अव्वलस्थान प्राप्त करण्याचा त्याचा येथे प्रयत्न असणार आहे.
35 वर्षीय नदालने मात्र आपण विक्रमासाठी कधीच खेळत नाही, याचा फायनलच्या पूर्वसंध्येला पुनरुच्चार केला. नदालला कोरोनातून सावरण्यापूर्वी बराच संघर्ष करावा लागला असून याशिवाय, त्याची पायाची दुखापत देखील कारकिर्दीसाठी धोकादायक अशीच ठरली होती. या सर्व अडचणींवर मात करत त्याने विजयाच्या ट्रकवर येण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. सध्या तो मागील सलग 10 सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला असून हीच विजयी घोडदौड कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात त्याने मेलबर्नमध्येच एटीपी 250 टायटल जिंकण्यात यश मिळवले. एखाद्या ग्रँडस्लॅममध्ये अंतिम फेरीत धडक मारण्याची त्याची ही एकूण 29 वी व ऑस्ट्रेलियातील 6 वी वेळ आहे.
पुरुष दुहेरीत किर्गीओस व कोकिनाकिस अजिंक्य
ऑस्ट्रेलियन बॅड बॉईज, स्पेशल के अशा टोपण नावांनी ओळखल्या जाणाऱया निक किर्गीओस व कोकिनाकिस या ऑस्ट्रेलियन जोडीने पुरुष दुहेरीच्या जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. शनिवारी रंगलेल्या अंतिम लढतीत त्यांनी आपलेच राष्ट्रीय सहकारी मॅथ्यू एब्डन व मॅक्स पर्सेल यांना 7-6, 6-4 अशा फरकाने मात दिली. ही लढत 1 तास 35 मिनिटात निकाली झाली.
पुरुष दुहेरीत किर्गीओस व कोकिनाकिस या स्पेशल ‘के’ नी जेतेपद संपादन केले असले तरी ते विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱयातही राहिले. पंचांशी हुज्जत घालणे, रॅकेट कोर्टवर आदळणे यामुळे ते टीकेचे लक्ष्य ठरले.