बर्मिंगहम / वृत्तसंस्था
ऍस्टन व्हिलाने दुसऱया सत्रात अवघ्या 9 मिनिटात चक्क 3 वेळा गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेत प्रीमियर लीग हंगामात 3-0 असा विजय संपादन केला. शिवाय, प्रतिस्पर्धी एव्हर्टनची अपराजित मालिका देखील खंडित केली. हा सामना 65 व्या मिनिटापर्यंत गोलशून्य बरोबरीत होता. मात्र, 66 व्या मिनिटाला मॅटी कॅशने संघाचे खाते उघडले, 69 व्या मिनिटाला ल्युकास डिग्नेचा स्वयंगोल झाला तर 75 व्या मिनिटाला लिओन बेलीने संघाचा तिसरा गोल नोंदवला. बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरलेल्या बेलीने पॉवरफुल ड्राईव्हवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला होता. व्हिलाच्या खात्यावर आता 5 सामन्यातून 7 गुण आहेत तर इव्हर्टनने 5 सामन्यात 10 गुण नोंदवले आहेत. या विजयासह व्हिलाने गुणतालिकेत किंचीत सरशी प्राप्त केली.