चाचणी दरम्यान 1 जीबी प्रति सेकंद स्पीड- चित्रपट मिनिटात डाऊनलोड
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशामध्ये 5 जी नेटवर्कच्या चाचणीसंदर्भात चर्चा सुरु आहे. सरकारकडूनही देशामध्ये 5-जी नेटवर्क लागू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये सध्या देशातील दूरसंचार कंपनी भारती एअरटेल आणि टेक्नॉलॉजी कंपनी एरिक्सनने गुरुग्रामच्या सायबर पेंद्रामध्ये 5-जी नेटवर्कची चाचणी घेतली आहे. पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार 5 जी नेटवर्कवर 1 जीबी प्रति सेकंदाचा स्पीड राहिल्याची माहिती आहे.
उपलब्ध माहितीनुसार एरिक्सनने म्हटल्याप्रमाणे भारती एअरटेल आणि एरिक्सनने गुरुग्रामच्या सायबर केंद्रामध्ये भारती एअरटेलच्या लाईव्ह 5-जी नेटवर्कची चाचणी पार पडली आहे. 5-जी चाचणीच्या नेटवर्कची सुरुवात, प्रक्रिया व चाचणी ही दूरसंचार नियमावलीच्या आधारेच घेण्यात आली आहे. यावर 3500 मेगाहर्ट्ज रेडिओ स्पेक्ट्रम बँडचा प्रयोग करण्यात आला आहे. गती पूर्वीच्या तुलनेत अधिक तीव्र आहे. देशामध्ये स्पीडसोबत इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस 5जी सेवा पुढील वर्षात मिळण्यास प्रारंभ होणार आहे.
स्पेक्ट्रम कंपन्यांना मंजुरी
दूरसंचार विभागाने मागील 4 मे रोजी 5 जी चाचणीसाठी स्पेक्ट्रम कंपन्यांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली होती. परंतु यामध्ये कोणतीही कंपनी चीनी टेक्नॉलॉजीचा वापर करु शकणार नाहीत, असे विभागाने म्हटले होते. दूरसंचार विभागाकडून रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आणि एमटीएनएलचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.