फिच रेटिंगच्या अहवालात माहिती : व्होडाफोन-आयडियाला मात्र फटका बसणे शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाला येत्या काळात झटका बसरण्याचे संकेत असून दुसऱया बाजूला एअरटेल आणि जिओ या कंपन्या नफ्यात राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये व्होडाफोन-आयडियाची ग्राहक संख्या येत्या 12 महिन्यात 5 ते 7 कोटींने घटण्याचे अनुमान असून भारती एअरटेलसह रिलायन्स जिओ या कंपन्यांची ग्राहक संख्या मात्र वधारत जाऊ शकते, असे प्रतिपादन रेटिंग एजन्सी फिच कडून करण्यात आले आहे.
फिचने दिलेल्या माहितीनुसार मागील दोन वर्षात व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक जवळपास 15.5 कोटींने कमी झाले आहेत. येत्या वर्षभरातही यात घट होण्याचे संकेत आहेत. परंतु दुसऱया बाजूला याचा लाभ रिलायन्स जिओ आणि काहीप्रमाणात भारती एअरटेला होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
एअरटेलने जोडले 1.4 कोटी ग्राहक
आर्थिक वर्ष 2020-21 मधील दुसऱया तिमाहीत भारती एअरटेलने तब्बल 1.4 कोटी ग्राहकांना आपल्याशी जोडले आहे. याचदरम्यान जिओने फक्त 70 लाख ग्राहकांची नवी भर टाकल्याची माहिती मिळाली आहे. व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहक संख्येत मात्र वेगाने घट नोंदवली जात असल्याचे दिसत आहे. आगामी काळात कंपन्यांमधींल स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे ग्राहकांचा लाभ होणे शक्य आहे.
व्होडाफोन-आयडिया भांडवल उभारण्याच्या तयारीत व्होडाफोन-आयडिया 3.4 अब्ज डॉलर उभारण्याची योजना आखत आहे. यामध्ये इक्विटी आणि डेट या दोन्हीं मार्गांचा समावेश आहे. परंतु या रक्कम उभारणीत कंपनी आपल्या विस्तारासह अन्य सेवा देण्यात कमी पडणार असल्याचे संकेत असून काही ग्राहकांनी व्होडाफोन आयडियाला सोडून दिले असल्याने ते पुन्हा परतण्याची शक्यता अतिशय कमी असल्याची माहितीही फिचने दिली आहे.