14 देशांची विमाने सहभागी – संरक्षणविषयक उत्पादन प्रदर्शनही सुरु
प्रतिनिधी/ बेंगळूर
संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर भारत संकल्पनेला प्राधान्य देत बेंगळूरच्या यलहंका येथील भारतीय वायू दलाच्या विमानतळावर बुधवारी एअरो इंडिया शो 2021 ला उत्साहात प्रारंभ झाला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी एअरो शोला चालना दिली. कोरोनाच्या सावटाखाली सुरू झालेला एअरो शो शुक्रवारपर्यंत चालणार असून यावेळी अनेक कंपन्या, देशांमध्ये संरक्षणविषयक करार होणार आहेत. त्याचप्रमाणे 14 देशांची विमाने आकाशात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.
एअरो इंडिया शोच्या पार्श्वभूमीवर आयोजित संरक्षणविषयक उत्पादन प्रदर्शनात 523 भारतीय आणि 78 विदेशी कंपन्या अशा एकूण 601 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. शिवाय 14 देशांची विमाने आणि हेलिकॉप्टर्सदेखील एअरो शो मध्ये चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत आहेत.
अलीकडेच फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली आणि भारतीय वायू दलामध्ये समाविष्ट करण्यात आलेली राफेल विमाने प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहेत. त्याचप्रमाणे भारतीय वायू दलाची सारंग आणि सूर्यकिरण हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक कसरतींचा अनुभवही प्रेक्षकांना डोळय़ात साठविता आला. अमेरिकेची बी-1 आयबी, लाँजर सुपरसॉनिक विमानांच्या प्रचंड आवाजाने प्रेक्षकांच्या मनात काही वेळ भीती निर्माण केली. भारताच्या रुद्र लघु लढाऊ विमाने, तेजस विमानांनी केलेल्या विविध प्रकारच्या कसरतींनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचप्रमाणे सुखोई-30 एमके, जग्वार विमानांचा प्रचंड वेग आणि थरारही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला.
आणखी दोन दिवस वायू दलाच्या यलहंका विमानतळावर विमाने, हेलिकॉप्टर्सच्या थरारक कसरती अनुभवता येणार आहेत. मागील वर्षी याच ठिकाणी कार पार्किंगमध्ये अग्नीकल्लोळात 60 हून अधिक कार्स बेचिराख झाल्या होत्या. या कटू आठवणी विसरून यावेळेचा एअरो शो पाहण्यासाठी बेंगळूरसह विविध भागातून प्रेक्षक बेंगळुरात दाखल झाले आहेत. कोरोना परिस्थितीमुळे कोविड मार्गसूचीचे पालन करूनच प्रेक्षकांना प्रवेश दिला जात आहे.
यलहंका येथे बुधवारपासून सुरु झालेल्या तीन दिवसांच्या एअरो शोनिमित्त कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, एक पोलीस आयुक्त, 10 डीसीपी, 30 हून अधिक एसीपी, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यासह एकूण 5 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 52 केएसआरपी तुकडय़ा, 26 सीएआर तुकडय़ा आणि यलहंका विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ 1500 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एअरो शोमध्ये सहभागी झालेल्या विमानांच्या उड्डाणासाठी अडचणीचे ठरू नये यासाठी ड्रोन, पॅराशूट, लहान आकाराच्या एअरक्राफ्टच्या उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पतंग आणि पाळीव कबुतरांच्या उड्डाणावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
विमाननिर्मितीत कर्नाटकाचा वाटा 65 टक्के
देशातील एकूण विमाननिर्मिती उत्पादनांपैकी 65 टक्के उत्पादने कर्नाटकात निर्माण केली जात आहेत. औद्योगिकस्नेही, पर्यावरणस्नेही आणि उत्तम प्रशासनाच्या आधारे आपण या क्षेत्रात आणखी प्रगती साध्य करण्याच्या तयारीत आहे. सलग 13 व्या वेळेस बेंगळूरमध्ये एअरो शो होत आहे. याला राज्यातील जनतेकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी एअरो शोच्या उद्घाटन कार्यक्रमात केले.
संरक्षण उत्पादनांबरोबरच नागरी विमानसेवेतही राज्याने मैलाचा दगड पार केला आहे. राज्य सरकार, केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारतला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राबणाऱया हातांना काम देण्यासाठी विविध उत्पादनांच्या निर्मितीतही राज्य सरकार पुढाकार घेत आहे, असेही येडियुराप्पा म्हणाले.
राष्ट्रपती शुक्रवारी एअरो शोमध्ये सहभागी होणार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 4 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत कर्नाटक दौऱयावर येणार आहेत. गुरुवार दि. 4 रोजी बेंगळूरला येणार असून शुक्रवार दि. 5 रोजी ते यलहंका विमानतळावर सुरू असणाऱया एअरो इंडिया शो मध्ये सहभागी होणार आहेत. 6 फेब्रुवारी रोजी ते मडिकेरी येथे भेट देतील. ते जनरल तिम्मय्या यांच्या निवास्थानामधील वस्तूसंग्रहालयाचे उद्घाटन करतील. तर 7 रोजी ते बेंगळूरमधील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या वार्षिक संमेलनात सहभागी होतील.