ऑनलाईन टीम / मुंबई :
एअर इंडियाकडून प्रवाशांची माहिती साठवण्यात आलेल्या एका डेटा सर्व्हरवर सायबर हल्ला झाला आहे. सायबर हल्ल्यात प्रवाशांचे नाव, जन्मतारीख, संपर्क क्रमांक, पासपोर्टवरील माहिती तसेच क्रेडीट कार्डची माहिती लीक झाली आहे.
एअर इंडियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2021 अखेर एअर इंडियाच्या ‘SITA’ नामक डेटा सर्व्हरवर सायबर हल्ला झाला. यात ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 या कालावधीतील 45 लाख लोकांची माहिती लीक झाली. प्रवाशांच्या माहितीबरोबरच त्यांच्या क्रेडीट कार्डचा डेटा लीक झाला आहे. मात्र, क्रेडीट कार्डचा सीव्हीव्ही लीक झाला नाही. प्रवाशांची माहिती सुरक्षित रहावी, यासाठी कंपनी डेटा प्रोसेसर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. प्रवाशांना त्यांचे पासवर्ड बदलण्यासाठी सांगण्यात येत आहे.
सर्व्हर हॅक झाल्यानंतर त्यांची सुरक्षितता वाढविण्यात आली असून, एअर इंडिया भारतातील आणि भारताबाहेरील एजन्सीजच्या संपर्कात आहे.