विमान प्रवाशाच्या लाजिरवाण्या कृतीनंतर 4 कर्मचाऱयांसह एका पायलटला हटवले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एअर इंडियाच्या विमानामध्ये एका प्रवाशाने वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी माफी मागितली आहे. शनिवारी यासंबंधी निवेदन जारी करत एअर इंडिया अशा प्रकरणांबद्दल गंभीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सहप्रवाशांच्या वाईट वागणुकीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असल्याबद्दल एअर इंडिया प्रशासन दुःखी असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, विमानात मद्यधुंद अवस्थेत महिलेवर लघुशंका करणाऱया शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी बेंगळूरमधून अटक केली आहे.
विमानातील प्रवासादरम्यान महिलेवर लघुशंका केल्याचे प्रकरण गेल्या आठवडाभरात जोरदार चर्चेत आल्यानंतर सीईओ विल्सन यांनी चार क्रू मेंबर्स आणि एका पायलटला सेवेतून काढून टाकले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आता विमान कंपन्या आपल्या मद्य सेवा धोरणांचे पुनरावलोकन करत आहेत. 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघुशंका केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधिताचा शोध सुरू केला होता.
संबंधित प्रवाशाला बेंगळूरमधून अटक
न्यूयॉर्कहून येणाऱया एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणाऱया शंकर मिश्रा या व्यक्तीला तब्बल 42 दिवसांनी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी शंकर मिश्राला शुक्रवारी मध्यरात्री बेंगळूर येथून अटक केली. तो संजयनगर येथे राहत होता. त्याला शनिवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याने आपल्या वकिलांकरवी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर 11 जानेवारीला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
लोकेशन ट्रेसच्या माध्यमातून कारवाई
शंकर मिश्राचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लोकेशन टेस करण्यास सुरुवात केली होती. 28 डिसेंबर रोजी एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपी शंकर मिश्रा सतत आपले वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. शंकर मिश्राचे शेवटचे लोकेशन बेंगळूरमध्ये सापडले होते. त्याच्या आधारे शोध घेण्यात आला. कारवाईच्या भीतीने तो सातत्याने आपला मोबाईल चालू-बंद करत होता. त्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडचणी आल्या. अखेर त्याला अटक करण्यात आली.
शंकर मिश्राची कंपनीकडून हकालपट्टी
शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी ‘वुल्फ फार्गो’ने त्याला नोकरीवरून कमी केले आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱयांकडून व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या योग्य वर्तनाची अपेक्षा करते. शंकर मिश्रावरील आरोप अत्यंत खेदजनक असल्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे. तसेच या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.