ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एअर इंडियाच्या 5 वैमानिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ड्युटीवर हजर होत असताना कोणतेही विमान उड्डाण करण्यापूर्वी 72 तास आधी वैमानिकांची कोरोनाची टेस्ट केले जाते. अशी चाचणी केली असता या पाच जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही वैमानिक मुंबई मधील आहेत. आणि ते बोईंग – 787 विमानाचे उड्डाण करतात. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या पाचही जणांनी मागच्या आठवड्यात एकही उड्डाण केले नव्हते. मात्र, हे पाच ही जण 20 एप्रिलपूर्वी मालवाहू विमानांच्या उड्डाणासाठी चीनमध्ये गेले होते.
दरम्यान, या पाचही वैमानिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाने वंदे भारत मिशन अंतर्गत विशेष विमाने पाठवण्यास सुरुवात केली आहे.