वृत्तसंस्था / हैदराबाद
खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) ट्विटर अकौंट रविवारी हॅक झाले आहे. हॅकर्सने पक्षाच्या नावाच्या जागी एलन मस्क यांचे नाव लिहिले आहे. याचबरोबर ट्विटर डीपीवर मस्क यांचा फोटो लावला ओहे. मस्क हे जगातील दुसऱया क्रमांकाचे धनाढय़ असून स्पेसएक्स आणि टेस्ला यासारख्या कंपन्यांचे अध्यक्ष आहेत.
याचदरम्यान ट्विटरने रविवारी एआयएमआयएमच्या उत्तरप्रदेश प्रमुखाचे ट्विटर अकौंट प्रतिबंधित केले. काही काळासाठी ही कारवाई करण्यात आली होती. एआयएमआयएम नेत्याचे ट्विटर खाते काही काळाने पुन्हा सुरू झाले आहे.
एआयएमआयएम उत्तरप्रदेशातील 100 जागांवर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा ओवैसी यांनी अलिकडेच केली होती. याकरता त्यांनी उत्तरप्रदेशात सुहेलदेव भारतीय समाज पक्षासोबत मिळून भागीदारी संकल्प मोर्चा तयार केला आहे. यात आणखीन काही छोटे राजकीय पक्ष सामील होण्याची शक्यता आहे.
कुठल्याही स्थितीत योगी आदित्यनाथ यांना 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचे ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. ओवैसी यांच्या आव्हानावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले होते. ओवैसी मोठे नेते असून देशात प्रचार करतात. त्यांना एका विशेष समुदायाचे समर्थन प्राप्त आहे. पण उत्तरप्रदेशात भाजपला ते आव्हान देऊ शकत नाहीत. भाजप स्वतःचे मुद्दे, मूल्यांसह निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे योगींनी म्हटले होते.