नागराज जाधवला सामनावीर, मालिकावीरचा मान
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित अभयकुमार करडी स्मृती 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एआयएमएस क्रिकेट अकादमी सावंतवाडी संघाने आनंद अकादमीचा 10 गडय़ांनी पराभव करून अभयकुमार करडी चषक पटकाविला. नागराज जाधवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामहट्टी येथील भगवान महावीर स्कूलच्या टर्फ विकेट खेळपट्टीवर झालेल्या अभयकुमार करडी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी अ संघाने पहिल्या डावात 33.5 षटकात सर्व बाद 123 धावा केल्या. लाभ वेर्णेकरने 8 चौकारासह 35 तर नील पवारने 27 धावा केल्या. एआयएमएस सावंतवाडीतर्फे पराग अरबकरने 4 तर रूदेश कर्णिकने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एआयएमएस सावंतवाडी संघाने पहिल्या डावात 70.4 षटकात सर्व बाद 243 धावा करून 120 धावांची आघाडी पहिल्या डावात मिळविली. नागराज जाधवने 11 चौकारासह 82, सुजल कोरगनकरने 5 चौकारासह 30 तर पार्थ नारने 5 चौकारासह 29 धावा केल्या. आनंदतर्फे मोहिदने 4 तर तनिष्क जैनने 3 गडी बाद केले.
आनंद अकादमी अ संघाने दुसऱया डावात 36.2 षटकात सर्व बाद 137 धावा केल्या. लाभ वेर्णेकरने 7 चौकारासह 34, नील पवारने 31, नीलेश रनसुभेने 18 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे रूदेश कर्णिकने 5 तर पराग अरबकरने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केवळ 19 धावांचे उद्दिष्ट घेऊन खेळताना एआयएमएस संघाने 2 षटकात बिनबाद 19 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. इशान कबाडेने 4 चौकारासह नाबाद 19 धावा केल्या.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे हणमंत कणगले, शशीकांत बाडकर, आनंद पिपरे, आनंद करडी, प्रशांत मिरजकर, एम. के. गेंजी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एआयएमएस क्रिकेट अकादमी सावंतवाडी व उपविजेत्या आनंद क्रिकेट अकादमी अ संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर नागराज जाधव, उत्कृष्ट गोलंदाज पराग आरबकर (सावंतवाडी), उत्कृष्ट फलंदाज लाभ वेर्णेकर (आनंद अकादमी), मालिकावीर नागराज जाधव (सावंतवाडी) यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून आनंद कुंभार, प्रसाद सुगुर, फुरकान मुल्ला यांनी काम पाहिले.