क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित सुरेश गडकरी चषक 11 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एआयएमएस सावंतवाडी संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाचा 6 गडय़ांनी पराभव करून जेतेपद मिळवले. मालिकावीर व सामनावीर फरहान आगाला गौरविण्यात आले.
भुतरामहट्टी येथील महावीर जैन शाळेच्या मैदानातील टर्फ विकेटवर अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 24.3 षटकात सर्वबाद 109 धावा केल्या. त्रिविक्रम रेणकेने 23, दर्श रायकर व इम्तियाज मंडल यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे सोहम सावंतने 9 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एमआयएमएस सावंतवाडी संघाने 20.3 षटकात 4 बाद 111 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. यश पाटकरने 5 चौकारासह नाबाद 31, फरहान आगाने 3 चौकारासह नाबाद 18 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे अवनिश बी.ने 18 धावात 2 गडी बाद केले.
पुरस्कर्ते सुरेश गडकरी, दर्शन गडकरी, आनंद करडी, राहुल रेगे, प्रमोद पालेकर यांच्या हस्ते विजेत्या सावंतवाडी संघाला व उपविजेत्या बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाला गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर फरहान आगा (सावंतवाडी), उत्कृष्ट फलंदाज आरूष पुत्रन (बीएससी), उत्कृष्ट गोलंदाज उस्मा खान (सावंतवाडी), उत्कृष्ट यष्टीरक्षक ओजस गडकरी (आनंद), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अद्वैत चव्हाण (आनंद), स्पर्धेत छाप सोडणारा खेळाडू श्लोक चांदीलकर (आनंद), मालिकावीर फरहान आगा (सावंतवाडी) यांना गौरविण्यात आले. पंच म्हणून सुनील देसाई व ईश्वर इगगी यांनी काम पाहिले.