एटीकेएमबीचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एटीके-मोहन बागान संघातील दोन खेळाडू प्रबिर दास व एसके साहिल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतर एएफसी संघटनेने मालदिव्हमध्ये होणारे त्यांचे सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मालदिव्हला प्रयाण करण्यापूर्वी 7 मे रोजी एटीके मोहन बागान संघातील सर्व खेळाडूंची कोलकात्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये कोव्हिड 19 चाचणी घेण्यात आली होती. त्यात दास व साहिल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर हा संघ गट ड मधील सामन्यासाठी माले येथे दाखल होणार होता. एएफसीने घालून दिलेल्या दिशानिर्देशानुसार, मायदेशातून बाहेर प्रयाण करण्याच्या दोन दिवस आधी प्रत्येक खेळाडूने निगेटिव्ह अहवाल सादर करणे आवश्यक आहे. ‘प्रबिर दास व साहिल दोघेही पॉझिटिव्ह असल्याने त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. इतरांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आहेत,’ असे एटीकेएमबी संघातील एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. एटीकेएमबी संघ सोमवारी 10 रोजी मालदिव्हकडे प्रयाण करणार होता. पण एएफसीने सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केल्याने एटीकेएमबी संघाचे आता प्रयाण रद्द करण्यात आले आहे. लांबणीवर टाकण्याचा निर्णय का घेतला, हे मात्र एएफसीने स्पष्ट केलेले नाही.
‘एएफसी चषक (दक्षिण) साखळी फेरीतील सामने आता लांबणीवर टाकण्यात आले असून त्यांच्या नवीन तारखा नंतर जाहीर करण्यात येतील,’ असे एएफसीने दिलेल्या निवेदनात सांगितले. मात्र त्यात कारण दिलेले नाही. ‘या स्पर्धेत सहभागी सर्व क्लब्स व पदाधिकाऱयांना या निर्णयाची माहिती देण्यात आली असून मालदिव्हकडे येणे ते रद्द करू शकतात,’ असेही त्यांनी म्हटले आहे. एटीकेएमबी 14 मे रोजी या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात करणार होते. या संघाचा कर्णधार रॉय कृष्णा फिजीमध्ये असून तेथून तो थेट मालदिव्हला प्रयाण करणार होता.