वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
कोरोना महामारी समस्येच्या भीतीमुळे आशियाई चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील पूर्व विभागातील संघांचे मलेशियात खेळविले जाणारे सामने आता कतारमध्ये घेण्याचा निर्णय शुक्रवारी आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने घेतला आहे.
आशियाई चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील विविध गटातील बाकी असलेले सर्व सामने आता दोहामध्ये 18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान घेतले जातील. मात्र, पश्चिम विभागातील संघांच्या सामन्यांचाही यामध्ये समावेश राहील. या स्पर्धेतील अंतिम सामना 19 डिसेंबरला खेळविला जाईल. पूर्व विभागातील सामन्यांचे यजमानपद स्वीकारण्यास कतारने होकार दर्शविला आहे. पूर्व विभागातील संघांमध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया आणि थायलंड यांचा समावेश आहे. कोरोना महामारी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पूर्व विभागातील संघांचे सामने मलेशियातून कतारमध्ये हलविण्याच्या निर्णयाला कतार फुटबॉल संघटनेने आपला पूर्ण पाठिंबा दर्शविल्याचे एएफसीचे सचिव डेटो जॉन यांनी सांगितले.