रस्ते दुर्घटना गमावला होता एक पाय
काही लोकांसोबत जीवनात दुर्घटना घडल्यावर ते सर्वस्व गमावल्याचे मानू लागतात. या दुर्घटनांचा प्रतिकूल परिणाम करून घेतल्याने जीवनात आणखीन काही करण्याची इच्छाच संपून जाते. परंतु काही लोक याच्या एकदम उलट असतात. अशाच लोकांपैकी एक आहे झारखंडमध्ये राहणारी रेखा मिश्रा. तिला एका दुर्घटनेत एक पाय गमवावा लागला होता.
धनबाद जिल्हय़ातील वीरसिंहपूर गावात रेखा मिश्रा राहते. वयाच्या 11 व्या वर्षी रेखाला एका दुर्घटनेत एक पाय गमवावा लागला. 2014 मध्ये पश्चिम बंगालच्या एका गावात मेळा बघून परतत असताना रस्ते दुर्घटनेच्या तावडीत ती सापडली. तिला जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांना एक पाय कापावा लागला होता.
खूप रडली होती…
स्वतःचा एक पाय कापण्यात आल्याचे कळल्यावर रेखा खूप रडली होती. एका पायाशिवाय जगण्याचा विचारसुद्धा ती करू शकत नव्हती. काळाच्या ओघात शारीरिक जखमा भरून निघाल्या, पण मनातील घाव भरून काढण्यासाठी रेखा काहीतरी करून दाखवू इच्छित होती. तिच्या मैत्रिणी तिला शाळेत जाण्यासाठी मदत करत होत्या. टीव्ही पाहता पाहता तिच्यामध्ये कलेची आवड निर्माण होऊ लागली.
सोशल मीडियावरून शिकली नृत्य
रेखा स्वतःला प्रेरित करण्यासाठी प्रेरणात्मक भाषणं ऐकायची. टीव्ही आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून ती हळूहळू नृत्य शिकू लागली. शिक्षणही सुरू ठेवले आणि यात एका शिक्षकाने तिची मदत केली. रेखाने शालेय कार्यक्रमांमध्ये नृत्य करण्यास सुरुवात केली
हिंमत वाढू लागली
रेखाचे नृत्य सर्वांना आवडू लागले होते. मित्रांच्या सांगण्यावरून तिने स्वतःच्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यास सुरुवात तकेली. लोकांनाही तिचे नृत्य पसंत पडू लागले. ती स्वतःच्या गावातील गल्ल्यांमध्ये, शेतांमध्ये नृत्य करते. रेखाच्या युटय़ूब चॅनेलला 8 हजारांहून अधिक लोक पसंत करतात. एक दिवस टीव्ही शोमध्ये झळकण्याची तिची इच्छा असून याकरता ती मेहनत करत आहे. स्वतःचा निर्धार पूर्ण करण्यासाठी एक पाय पुरेसा असल्याचे ती सांगते.