मराठी भाषिकांच्या विजयासाठी युवकांमध्ये नवचैतन्य
बेळगाव / प्रतिनिधी
सर्व शहराचे लक्ष लागून राहिलेल्या आणि दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक शुक्रवारी होत आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असली तरी मराठी भाषिक उमेदवारांकडे जनमताचा कौल आहे. मराठी उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, मराठी भाषिक उमेदवारांना विजयी करण्याच्यादृष्टीने युवक, वृद्ध, महिला मंडळे यांच्यासह सर्वांनीच कंबर कसली आहे. यामुळे मराठी भाषिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत ठिकठिकाणी प्रचार फेऱया आणि मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या निवडणुकीत मराठी भाषिकांच्या एकजुटतेची वज्रमूठ आवळून मराठी भाषिकांनाच निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता बुधवार दि. 1 रोजी सकाळी 7 वा. झाली. त्यामुळे उमेदवारांना मंगळवारीच वॉर्डमधील सर्व मतदारांच्या गाठीभेटी घ्याव्या लागल्या. यावेळी उमेदवारांनी मतदारांचा आशिर्वाद घेण्यासाठी संपूर्ण वॉर्ड पिंजून काढला. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या प्रचारफेरीवेळी नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त केला. प्रत्येक गल्लीतील मंडळाच्या वार्ताफलकावर म. ए. समितीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा मजकूर लिहिण्यात आला आहे. युवकांना हेरून यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार, आमदार निवडणुकीवेळी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर प्रचार करून युवकांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्ष करीत असतात. पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱया महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचा हेतू निष्फळ ठरणार आहे.
बेळगावातील सर्वच युवकांनी महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता अबाधित ठेवण्याचा निर्धार केला आहे. विविध भागातून जुने जाणकार आणि युवक निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत युवक वर्गाचा सहभाग वाढला आहे. म. ए. समिती आणि मराठी भाषिक उमेदवारांच्या विजयासाठी संपूर्ण युवक आणि सर्व मराठी भाषिक मतदार एकवटले आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये अधिक उमेदवार असले तरी एकीच्या माध्यमातून माघार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच मराठी भाषा, संस्कृती आणि महापालिकेवरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक रिंगणातून अनेक उमेदवारांनी माघार घेऊन मराठी भाषिक उमेदवारांना तसेच म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा व्यक्त केला आहे.
महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष चिन्हावर निवडणूक लढवित असल्याने ही निवडणूक मराठी भाषिकांची शेवटची असल्याच्या कांगावा करीत आहेत. त्यामुळे युवकांमध्ये आणि मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मराठय़ांची सत्ता अबाधित ठेवणारच असा भीमटोला युवकांनी लगावला आहे. मराठी संस्कृतीसाठी संपूर्ण शहरातील वातावरण समितीमय झाले आहे. मतभेद असले तरी बाजूला ठेवून प्रामाणिक, एकनि÷ आणि मराठीसाठी कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे राहून निवडून देण्याचा निर्धार केला आहे. विविध युवक मंडळे, पंच मंडळी, महिला मंडळे आणि सामाजिक संस्थांनी मराठी भाषिक उमेदवारांना पाठिंबा देऊन निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. काही वॉर्डमधून नागरिकांनीच उमेदवारांना सर्व प्रकारचे पाठबळ देवून सहकार्य केले आहे.
काही उमेदवारांसाठी लोकवर्गणीतून निधी उभारून निवडून देण्याचा ध्यास ठेवला आहे. मराठी ऐक्मयासाठी युवा, वृद्ध, महिला, अशा सर्वच स्तरातील नागरिकांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे महापालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित राहणार यात तिळमात्र शंका नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मराठीसाठी सर्वांनीच मतभेद बाजूला ठेवावे आणि म. ए. समितीच्या अधिकृत आणि मराठी भाषिक उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
मराठी भाषिक उमेदवारांकडे झुकते माप
श्रीकांत कदम यांच्या प्रचारफेरीत सहभागी झालेले मतदार.
महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची आमिषे दाखविण्यात येत आहेत. काही भागात मतदारांची कामे करून देण्याबरोबरच विकासकामे राबवित असल्याचा दिखावा करण्यात येत आहे. पण भूलथापांना बळी न पडता मराठी भाषिक उमेदवारांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. शहरातील प्रत्येक भागात मतदारांचा कल मराठी भाषिक उमेदवारांच्या बाजूने आहे.
वॉर्ड क्र. 44 मधील उमेदवार सुधीर पाटील आणि श्रीमती सुनिता जाधव-सुभेदार यांनी माजी नगरसेवक पंढरी परब यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच वॉर्डातील नागरिकांनी अनुभवी उमेदवार पंढरी परब यांच्या पाठिशी राहून निवडून द्यावे असे आवाहन केले आहे. पंढरी परब यांनी यापूवीच्या सभागृहात विविध पदावर कार्यरत राहून जनतेच्या हिताच्यादृष्टीने कार्य केले आहे. तसेच शहराच्या विकासाच्यादृष्टीने प्राधान्य दिले आहे. गट नेतेपद आणि स्थायी समिती चेअरमन म्हणून काम करताना नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना महापालिकेत पाठविण्यासाठी पाठिंबा वाढत आहे.
रतन मासेकर यांच्या पाठिमागे युवकांची फौज
वॉर्ड क्र. 41 मधील उमेदवार रतन मासेकर यांच्या पाठिमागे युवकांची फौज उभी राहिली आहे. आजवर नगरसेवक म्हणून त्यांनी भरपूर कार्य केले आहे. युवकांचे नेतृत्व सांभाळत वॉर्डातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. कायद्याचा आधार घेत महापालिका सभागृहात मुद्दे मांडून नागरिकांचे प्रश्न धसास लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले माजी नगरसेवक रतन मासेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी वॉर्ड क्र. 41 मधील मतदार सरसावले आहे.
वर्षा आजरेकर यांना निवडून देण्याचा निर्धार
वॉर्ड क्र. 49 मध्ये महिला वर्गाची गर्दी झाली आहे. मात्र यामध्ये माजी नगरसेविका वर्षा आजरेकर उच्च शिक्षित असल्याने त्यांचा अनुभव जास्त आहे. यापूर्वी शिवसेना – म. ए. समितीच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. तसेच प्रत्येक कार्यात अग्रेसर असल्याने लोकप्रियता मिळविली आहे. त्यामुळे त्यांना भरपूर पाठिंबा मिळत आहे. वर्षा आजरेकर यांना निवडून देण्याचा चंग मतदारांनी बांधला आहे.
वॉर्ड क्र. 22 मध्ये सूरज जाधव यांचे पारडे जड
वॉर्ड क्र. 22 मध्ये सूरज जाधव यांचे पारडे जड झाले आहे. युवकातून आणि वडिलधाऱयांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध उमेदवारांनी माघार घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. तसेच भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी वॉर्डातील नागरिक प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे दिसून येत आहे.
वंदना बेळगुंदकर यांना पाठिंबा
वॉर्ड क्र. 33 मधून म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवार माजी महापौर वंदना बेळगुंदकर निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी दोनवेळा महापौर म्हणून चांगले कार्य केले होते. सभागृहात त्यांचा वचक होता. प्रत्येक परिस्थिती हाताळत सभागृहाचे कामकाज केले होते. महापालिकेच्या कारभाराचा चांगला अनुभव असल्याने वंदना बेळगुंदकर या वॉर्ड क्र. 33 मधून पुन्हा निवडणूक लढवित आहेत. या वॉर्डातील समस्यांचे निवारण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांना परिसरातील नागरिकांचा भरपूर पाठिंबा आहे. महापालिकेत नव्याने समावेश करण्यात आलेल्या कंग्राळी खुर्द परिसरातील रामनगर, ज्योतीनगर, शाहूनगर अशा विविध भागातून भरपूर पाठिंबा मिळत आहे.
सुनिल बोकडे यांना वाढता पाठिंबा
वॉर्ड क्र. 29 चे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार सुनिल बोकडे निवडणूक लढवित असून, या भागात अनेक उमेदवार आहेत. हिंदवाडी, टिळकवाडी अशा विविध परिसराचा समावेश असलेल्या वॉर्डात सुनिल बोकडे यांना वाढता पाठिंबा आहे. सर्वसामान्य आणि साधे उमेदवार म्हणून परिचित असलेल्या सुनिल बोकडे यांना विजयी करण्यासाठी पाठिंबा व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीकांत कदम यांची प्रचारात आघाडी
वॉर्ड क्र. 28 मधून श्रीकांत कदम निवडणूक लढवित असून, पी. के. क्वॉर्टर्स, अळवणगल्ली, शहापूर, आनंदवाडी असा विविध परिसरात प्रचारात श्रीकांत कदम यांनी आघाडी घेतली आहे. यापूर्वी निवडून आलेल्या उमेदवारांनी पी. के. क्वॉर्टर्सच्या वसाहतीकडे तसेच या परिसराकडे दुर्लक्ष केले आहे. पी. के. क्वॉर्टर्समध्ये राहणाऱया मनपा कर्मचाऱयांच्या समस्या सोडविण्यास यापूर्वीचे नगरसेवक अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या कामगारांच्या समस्या सोडविण्याबरोबर चर्मकार बांधवांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी या ठिकाणी बदल होणे आवश्यक आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांनी श्रीकांत कदम यांना पाठिंबा व्यक्त करून निवडून देण्याचा निर्धार केला आहे.