मुंबई/प्रतिनिधी
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारने न्या. झोटिंग समिती नियुक्त केली होती. आता त्या समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याची माहिती समोर आली. आता झोटिंग समितीचा अहवाल जवळपास दीड वर्षानंतर आघाडी सरकारला सापडला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसेंना क्लिनचिट देणारा अहवाल गायब झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटतंय, झोटिंग समितीचा अहवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी गायब केला आहे. एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारचा आहे. तसं वातावरण देखील सध्या निर्माण झालं आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
आमचं सरकार असतं तर आमच्यावर आरोप झाला असता की, यांनीच जाणीवपूर्वक अहवाल गायब केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्यातील लोकांनी एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असा दावा देखील प्रवीण दरेकर यांनी केला आहे.