मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या सासू-सासऱयासह सूनेचा अंत, लोणंद गावच्या हद्दीत घटना, अपघातग्रस्त कार सापडली माळेगावात, कारचालक पसार
वार्ताहर / लोणंद
लोणंद गावच्या हदीत लोणंद ते खंडाळा जाणाऱया रोडवर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या सासू, सासरा, सून या तिघांना चारचाकीने चिरडले असून या झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. गाडीचा चालक न थांबता तेथून पसार झाला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. धडक दिलेली चारचाकी गाडी माळेगांव येथे सापडली असून त्या चालकाचा पोलीस तपास घेत आहेत.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लोणंद ते खंडाळा जाणाऱया रोडवर नेहमीप्रमाणे शांताबाई बबन धायगुडे (वय 60 वर्ष), बबन नाना धायगुडे (वय 70 वर्ष) व सारिका भगवान धायगुडे (वय 35 वर्ष) रा. बिरोबावस्ती लोणंद ता. खंडाळा हे सासु, सासरे, सुन बिरोबा वस्ती लोणंद येथून खेडचा तलाव येथे चालत व्यायामाला जात असताना लोणंद ते खंडाळा रोडला त्यांचे घरापासून साधारणपणे 150 फुट अंतरावर खेड बाजुकडे गेले असताना एक चारचाकी पांढऱया रंगाची कार ही खंडाळा बाजुकडून भरधाव वेगाने आली. रोडचे साईडने एका पाठोपाठ चाललेल्या या तिघांना समोरुन जोराची धडक दिली व तेथून कार चालक जोरात निघुन गेला. त्यामध्ये हे तिघे गंभीर जखमी झाले होते.
जखमींना तत्काळ राहूल शेळके, अमित घाडगे, महेद्र माने यांनी लोणंद येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचाराकरता नेले असताना खाजगी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी शांताबाई धायगुडे व बबन धायगुडे हे अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे मयत झाल्याचे सांगितले. सारिका धायगुडे ही गंभीर जखमी असल्यामुळे तिला उपचारासाठी पुणे येथे नेहत असताना त्याही रस्त्यात मयत झाल्या आहेत, अशी खबर रामदास गोपाळ शेळके यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली.
एकाच कुटुंबातील या तिघांच्या अपघाती जाण्याने लोणंदमध्ये हळहळ व्यक्त होत होती. घटनास्थळी पांढरे रंगाचा चारचाकी कारचा बंपर व त्यावर एम एच 20 बी एन 9428 असा नंबर लिहिलेला बंपर तुटून पडला असून ती चारचाकी कार माळेगांव येथून ताब्यात घेतली आहे. कार चालक फरार असून या कार चालका विरोधात लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व महेश सपकाळ हे करीत आहेत.