दौसामधील बलात्कार प्रकरणाने खळबळ
वृत्तसंस्था/ दौसा
देशात बलात्काराच्या अनेक क्रूर घटनांचे वृत्त तुम्ही वाचले असेल, परंतु राजस्थानच्या दौसामध्ये घडलेल्या घटना हादरवून सोडणारी आहे. दौसामध्ये एका क्रूरकर्म्यावर एक किंवा दोन नव्हे तर बलात्काराचे 4 गुन्हे नोंद झाले आहेत. याताही 4 ही बलात्कार पीडिता एकाच घरातील आहेत. आरोपीने एकाच घरात एका मागोमाग एक अशा चार महिलांचे लैंगिक शोषण केले आहे.
ढाबाचालक विष्णू गुर्जरने हे बलात्कार केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. आरोपी विष्णू मागील एक वर्षापासून एका महिलेचे लैंगिक शोषण करत होता, परंतु छोटय़ा बहिणी आणि मुलींवर आरोपीची वक्रदृष्टी वळल्याचे समजताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. महिलेकडून गुन्हा नोंदविण्यात आल्यावर तिच्या दोन छोटय़ा बहिणी आणि मुलीनेही स्वतःवरील अत्याचाराला वाचा फोडून बलात्कार झाल्याचे म्हटले आहे. 22 जानेवारी रोजी महिलेने आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता. त्याचदिवशी आरोपीच्या विरोधात महिलेच्या एका अल्पवयीन बहिणीनेही बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 23 जानेवारी रोजी महिलेच्या दुसऱया बहिणीने याच आरोपीच्या विरोधात लैंगिक शोषणाची फिर्याद दिली. तर 25 जानेवारी रोजी महिलेच्या मुलीने आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.