राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजार पार : बेंगळूर, मंगळूर, मंडय़ात हाहाकार
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 69 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1056 वर पोहोचली आहे. मुंबई आणि दुबईहून परतलेल्यांपैकी अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत 476 जण बरे झाले असून 520 जणांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी मंगळूरमध्ये सर्वाधिक 16, बेंगळूर शहर आणि मंडय़ा जिल्हय़ात प्रत्येकी 13 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच बिदर व हासनमध्ये प्रत्येकी 7, उडुपीमध्ये 5, गुलबर्ग्यात 3, चित्रदुर्गमध्ये 2, बागलकोट, शिमोगा, कोलारमध्ये प्रत्येकी 1 असे एकूण 69 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर बिदरमध्ये 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 36 वर पोहोचला आहे.
मंगळूर जिल्हय़ात शुक्रवारी अचानक 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील 15 सर्वजण बुधवारी रात्री दुबईहून परतले होते. त्यामुळे मंगळूरमधील रुग्णसंख्या 43 वर पोहोचली आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. बुधवारी ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत दुबईहून 179 प्रवासी मंगळूर विमानतळावर परतले होते. त्याच दिवशी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून देण्यात आले होते. त्यामध्ये मंगळूरमधील 15 व उडुपी जिल्हय़ातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे विमानात त्यांच्या शेजारी बसलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दुबई विमानतळावर प्रवाशांची केवळ स्क्रिनिंग तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कोरोना असल्याचे स्पष्टपणे निदान झाले नव्हते.
मुंबईहून विशेष बसने परतलेल्यांपैकी मंडय़ा जिल्हय़ातील 13, हासनमधील 7, गुलबर्गा, बिदर आणि शिमोग्यात प्रत्येकी 1 जण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडूतील चेन्नईहून चित्रदुर्गला परतलेल्या दोघांना तर कोलारमधील एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बिदरमध्ये कंटेन्मेंट झोनमधील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघांना तर अन्य दोघांना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने आणि तेलंगणाहून परतलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाली आहे.
बेंगळूरमध्ये रुग्ण क्रमांक 653 च्या संपर्कात आलेल्या 11 जणांना आणि इतर दोघांना रुग्ण क्रमांक 911 च्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बेंगळूरमधील 11 पॉझिटिव्ह रुग्ण कंटेन्मेंट झोन असलेल्या पादरायनपूर वॉर्डातील आहेत. या जिल्हय़ात आतापर्यंत 202 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी निम्मे म्हणजे 101 जण कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त झाले आहेत. शुक्रवारी चौघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बिदरमध्ये एकाचा बळी
राज्यात आतापर्यंत 36 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर एका कोरोनाबाधित युवकाने इस्पितळाच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. बिदरमध्ये 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तो चिटगुप्पा येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी तो हैदराबादहून परतला होता. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तो बिदर जिल्हा इस्पितळात दाखल झाला होता. 12 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी त्याच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.