आणखी 99 कोरोना पॉझिटिव्ह, 139 जणांना डिस्चार्ज
जिल्हय़ात एकूण 1 हजार 900 जण कोरोनामुक्त
सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 73
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी
शासकीय कोविड लॅब पूर्ववत सुरू होताच जिल्हय़ात रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून रविवारी आणखी 99 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्येने तीन हजाराचा टप्पा गाठला आहे. रविवारी एकाच दिवसात आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 64 वर गेली आहे. तर 139 बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय कोविड 19 लॅबमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाच दिवसांपासूनचे कोरोना नमुने तपासणी करण्यात आले नव्हते. तब्बल 1 हजार नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यामुळे रॅपिड टेस्ट आणि पडवे येथील खासगी लॅबमधून तपासणी केलेल्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल मिळत होता. त्यामुळे चार दिवस रुग्णसंख्याही घटली होती. मात्र, कोविड लॅब रविवारी पूर्ववत सुरू झाली आहे. तसेच काही नमुने रत्नागिरीला तपासणीला पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल यायला सुरुवात झाली असून रविवारी झालेल्या तपासणीत 99 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आणखी 850 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आणखी सहा रुग्णांचा मृत्यू
जिल्हय़ात रविवारी नव्याने 99 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने तीन हजाराचा टप्पा पार केला. एकूण 3 हजार 37 एवढी संख्या झाली आहे. तर 139 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण 1 हजार 900 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 64 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे . सद्यस्थितीत जिह्यात 1 हजार 73 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
अ. क्र. विषय संख्या
1 एकूण अहवाल 22805
2 पॉझिटिव्ह आलेले अहवाल 3037
3 निगेटिव्ह आलेले अहवाल 18818
4 प्रतीक्षेतील अहवाल 950
5 सद्यस्थितीत जिह्यातील सक्रिय रुग्ण 1073
6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 64
7 डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1900
8 विलगीकरणातील एकूण व्यक्ती 8252
9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक विलगीकरणातील व्यक्ती 4584