बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत, नेमबाजीत मनीष नरवालची सर्वोच्च कामगिरी, भारताच्या खात्यावर आता 16 पदके
टोकियो / वृत्तसंस्था
दिव्यांगांसाठी टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिम्पिक्स स्पर्धेत भारताने शनिवारी एकाच दिवसात 2 सुवर्णपदके जिंकण्याचा भीमपराक्रम गाजवला. विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन प्रमोद भगतने पुरुष एकेरी एसएल3 क्लासमध्ये ऐतिहासिक सुवर्ण जिंकले तर नेमबाज मनीष नरवालने देखील सर्वोच्च कामगिरी केली. मनीषच्या इव्हेंटमध्येच सिंहराज अदानाने रौप्य जिंकले आणि यामुळे पहिली दोन्ही पदके भारताच्या खात्यावर जमा झाली.
प्रमोद भगतने सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम लढतीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलला पराभवाचा धक्का दिला तर मनोज सरकारने तिसऱया स्थानासाठी प्ले-ऑफ लढतीत जपानच्या दाईसुके फुजिहाराला पराभूत केले. या दोन्ही लढती सरळ गेम्समध्ये निकाली झाल्या.
पॅरालिम्पिक्समध्ये यंदा बॅडमिंटनचे पदार्पण झाले असून जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित भगत या क्रीडा प्रकारात सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय ठरला. टॉप सिडेड, तसेच आशियाई चॅम्पियन असलेल्या प्रमोदने द्वितीय मानांकित बेथेलला 21-14, 21-17 अशा फरकाने मात दिली. योयोगी नॅशनल स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत त्याने 45 मिनिटात विजय संपादन केला.
भगत व त्याची सहकारी पलक कोहली मिश्र दुहेरीच्या कांस्य प्ले-ऑफ लढतीत फुजिहारा व अकिको सुगिनो यांच्याविरुद्ध लढणार आहेत. या दोघांना यापूर्वी उपांत्य सामन्यात इंडोनेशियाच्या सुसान्तो व लियानी यांच्याकडून 3-21, 15-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता.
वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओ झालेल्या भगतला शेजारी बॅडमिंटन खेळले जात असल्याने त्याचा लळा लागला. 2006 मध्ये व्यावसायिक पॅरा बॅडमिंटनमध्ये उतरण्यापूर्वी तो खुल्या गटातील स्पर्धकांविरुद्धही खेळला. सध्या तो देशातील सर्वोत्तम पॅरा शटलर्सपैकी एक असून त्याच्या खात्यावर आतापर्यंत 45 आंतरराष्ट्रीय पदके नोंद आहेत. यामध्ये 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्ण, 2018 आशियाई पॅरा गेम्समध्ये 1 सुवर्ण व 1 कांस्यपदकाचा प्रामुख्याने समावेश आहे.
प्रमोदने बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणून नवी सुरुवात केली होती. पण, टोकियो पॅरालिम्पिक्स क्वॉलिफिकेशनकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने 2019 मध्ये यातून ब्रेक घेतला. 2019 मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार व बिजू पटनाईक पुरस्काराने सन्मानित केले गेले.
मनोजला कांस्य
31 वर्षीय मनोज सरकारने फुजिहारावर 22-20, 21-13 अशा फरकाने मात करत कांस्यपदक जिंकले. त्यापूर्वी, उपांत्य फेरीत मनोजला ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलविरुद्ध 8-21, 10-21 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, कांस्य पदकासाठी प्ले-ऑफ लढतीत मनोजने यश संपादन केले. सुहास यथिराज व कृष्णा नगर हे देखील पुरुष एकेरीत अनुक्रमे एसएल4 व एसएच 6 क्लासमध्ये अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
मनीषने पॅरालिम्पिक्स विक्रमासह तिसरे सुवर्ण, अदानाला कांस्य
नेमबाज मनीष नरवालने नव्या पॅरालिम्पिक विक्रमासह भारताला तिसरे सुवर्ण जिंकून दिले तर राष्ट्रीय सहकारी सिंहराज अदाना रौप्यपदकाचा मानकरी ठरला. रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या सर्जेई मॅलिशेव्हने 196.8 अंकांसह कांस्य मिळवले. 19 वर्षीय नरवालच्या खात्यावर या कॅटेगरीत विश्वविक्रम असून येथे त्याने पदार्पणाच्या पॅरालिम्पिक्समध्ये 218.2 अंकांची कमाई केली. त्याने पी4 मिश्र 50 मीटर्स पिस्तोल एसएच1 इव्हेंटमध्ये हा पराक्रम गाजवला.
यापूर्वी, 2016 मध्ये नरवाल कुटुंबियांनी त्याला शुटिंग रेंजवर नेले आणि तेथूनच त्याच्या सरावाला देखील सुरुवात झाली. मनीषची गुणवत्ता प्रशिक्षक जय प्रकाश नौतियाल यांनी हेरली होती. त्यानंतर मनीषने 2017 बँकॉक वर्ल्डकपमध्ये पी1 एअर पिस्तोल एसएच1 इव्हेंटमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकले.
39 वर्षीय सिंहराजने यंदा पॅरालिम्पिक्समध्ये आणखी एकदा यश संपादन करताना रौप्यपदकाची कमाई केली. त्याने 216.7 अंकांसह दुसरे स्थान मिळवले. या पॅरालिम्पिकमध्ये त्याने यापूर्वी पी1 पुरुष 10 मीटर्स एअर पिस्तोल एसएच1 इव्हेंटमध्ये कांस्य जिंकले होते. या पराक्रमासह सिंहराज एकाच पॅरालिम्पिक आवृत्तीत एकापेक्षा अधिक पदक जिंकणाऱया दिग्गजांमध्ये समाविष्ट झाला.
यंदा नेमबाज अवनी लेखरा (1 सुवर्ण व 1 कांस्य) व 1984 मध्ये जोगिंदर सिंग सोधी (1 रौप्य व 2 कांस्य) यांनी यापूर्वी असा पराक्रम गाजवला आहे. भारतीय नेमबाजांनी यंदा आतापर्यंत 5 पदके जिंकली असून त्यात 2 सुवर्णपदकांचा समावेश आहे.