सावंतवाडीत कोरोनाचा फैलाव चिंताजनक : संचयनीतील दांपत्य पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात रविवारी प्रथमच रेकॉर्डबेक 21 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तालुक्यात मिळून रुग्णसंख्या 28 वर गेली आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता शतकानजीक पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता पालिकेने आता रुग्णांची संख्या रोखण्यासाठी अधिक कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. नगरपालिकेचा आरोग्य विभाग कोरोना संशयितांचा ट्रेस करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु वाढती रुग्णसंख्या आरोग्य विभागाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. पालिका प्रशासनाकडे मात्र रविवारी दहाच रुग्णांची संख्या आहे.
दरम्यान, तळवडेत चार आणि दांडेलीत दोन रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या कोरोना रुग्णात पालिकेची महिला कर्मचारी आहे. तर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱयाचे आणखी दोन नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱयालाही कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाकडे याबाबत उशिरापर्यंत माहिती उपलब्ध नव्हती. शहरात सबनीसवाडा येथे एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली. ताप आल्याने तिने सहा दिवसांपूर्वी टेस्ट केली होती. परंतु अहवाल न आल्याने खासगी लॅबमध्ये तपासणी केली. त्यात पॉझिटिव्ह आढळली. सालईवाडा येथे निंबाळकर पीराजवळ एक कोरोना रुग्ण आढळला. तर संचयनी इमारतीत एक दांपत्य ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळली. उभाबाजारातही एक रुग्ण सापडला. त्यानेही सहा दिवसांपूर्वी टेस्ट केली होती. त्याचाही अहवाल उशिरा आला.
शहरात रुग्णांची संख्या 85 वर गेली आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहेत. शनिवारी सावंतवाडी आगारातील कंट्रोलर कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तर एकाच घरातील सातजण पॉझिटिव्ह आढळले होते. रविवारी त्यात आणखी भर पडली आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने द्विशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या रुग्णांची लिस्ट टप्प्याटप्प्याने येत असल्याने आरोग्य विभागालाही या प्रक्रियेत दिवसभर गुंतून राहावे लागत आहे. शहरात कोरोना रुग्ण सर्वच भागात आढळत असल्याने फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता नागरिक, प्रशासन यांनी अधिक सतर्क होण्याची गरज निर्मांण झाली आहे.