प्रतिनिधी/ मडगांव
लोटली पंचायतीतील एकाच सदस्याला भाजीपाला दिल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी भाजीपाला विक्रेत्याला या प्रकरणी धारेवर धरले.
आपल्या प्रभागातील मतदारांना वितरीत करण्यासाठी लोटली येथील सरकारी गाडय़ावर आलेला सर्व भाजीपाला लोटलीतील एका पंचाला दिल्याप्रकरणी गावातील सुमारे 23 ग्रामस्थांनी मायणा -कुडतरी पोलिसांकडे याप्रकरणी लेखी तक्रार केली. या तक्रारीची लगेच पोलिसांनी दखल घेत पोलीस घटनास्थळी आले. चौकशी केली तेव्हा ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे पोलिसांना आढळून आले आणि पोलिसांनी या गाडेवाल्याला ताकीद दिली आणि असा प्रकार न करण्याची तंबी दिली.
लोटली मासळी बाजाराजवळ असलेल्या भाजीपाला दुकानावर ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसानी दिली. या दुकानात आलेला भाजीपाल्याचा संपूर्ण साठा लोटलीतील एका पंचाने खरेदी केला. लोटली पंचायत गावातील लोकांना भाजीपाला वितरीत करणार अशी सबब सांगून हा संपूर्ण साठा त्या पंचाने उचलला असे स्पष्टीकरण दुकानदाराने केल्याचे पोलिसात करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे. लोटलीतील एका पंचाने अशा प्रकारचे कृत्य केल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी आपले म्हणणे या तक्रारीतून सरकारपर्यंत पोहोचविले.
जनतेसाठी म्हणून आलेला भाजीपाल्ल्याचा साठा लगेच संपल्याने दुकानदाराने दुकान लगेच बंद केले परिणामी इतर ग्रामस्थांना भाजीपाला मिळू न शकल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
या प्रकरणी कुडतरी पोलीस स्थानकाच्या प्रमुखांकडे संपर्क साधला तेव्हा असा प्रकार घडला असल्याची कबुली दिली आणि या प्रकारची पुनरावृत्ती होता कामा नये अशी दुकान मालकाला तंबी दिली असल्याचे या पोलीस अधिकाऱयाने सांगितले.