राष्ट्रीय महिआ आयोगाचा ट्विटरला आदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्र्यांचे खाते काहीकाळ बंद ठेवणे, भारताचा नकाशा विकृत स्वरुपात प्रसिद्ध करणे इत्यादी कारणांसाठी गेल्या आठवडय़ात वादग्रस्त ठरलेल्या ट्विटर या सोशल मीडिया कंपनीला राष्ट्रीय महिला आयोगानेही धारेवर धरले आहे. ट्विटरवर मोठय़ा प्रमाणात अश्लील सामग्री प्रसारित केली जात आहे. त्यात चाईल्ड पोर्नचाही समावेश आहे. हा सर्व अश्लील आशय एक आठवडय़ात काढून घेतला जावा, असा आदेश या कंपनीला महिला आयोगाने बुधवारी दिला.
दिल्ली पोलिसांनी ट्विटरची या संदर्भात चौकशी करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारीच ट्विटरच्या विरोधात तक्रार सादर करून घेतली असून चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे. ट्विटरचे भारतातील प्रमुख अधिकारी मनीष माहेश्वरी यांच्यावर या संदर्भात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
पत्र पाठविले
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विटरला काही दिवसांपूर्वी पत्र पाठवून अश्लील सामग्री काढून टाकण्यास सांगितले होते, मात्र ट्विटरने दाद दिली नव्हती. आता आदेशाचे पालन न झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. सध्या या कंपनीविरोधात उत्तर प्रदेशातून एक, तर मध्यप्रदेशातून एक अशा दोन तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत.