10 वर्षीय अनीशाला भेटले मोदी : राष्ट्रपती कधी होणार अशी केली विचारणा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
महाराष्ट्रातील 10 वर्षीय अनीशा पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटली आहे. अनीशाने ईमेल करत पंतप्रधानांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. या ईमेलनंतर मोदींनी तिला बोलाविले होते. अनीशाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. अनीशाने तुम्ही राष्ट्रपती कधी होणार असे विचारल्यावर पंतप्रधानांना हसू आवरता आले नाही.
अहमदनगरची अनीशा ही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची कन्या आहे. अनीशा मागील काही महिन्यांपासून पंतप्रधानांना भेटण्यास इच्छुक होती. पंतप्रधान अत्यंत व्यस्त असल्याने ते भेटीसाठी वेळ देऊ शकणार नाहीत, असे तिचे पालक तिला समजावत होते.
या मुलीने स्वतःच्या वडिलांच्या लॅपटॉपवरून पंतप्रधानांना एक ईमेल पाठविला. ‘हॅलो सर, मी अनीशा असून तुम्हाला प्रत्यक्ष भेटू इच्छिते’ असे तिने म्हटले होते. काही दिवसांनी या ईमेलला प्रतिसाद मिळाल्यावर अनीशाला स्वप्नपूर्ती खुणावू लागली. ‘दौड के चली आओ बेटा’ असे पंतप्रधानांनी कळविले होते. विखे पाटील कुटुंब संसदेत पोहोचल्यावर पंतप्रधानांनी ‘अनीशा कुठे आहे’ अशी विचारणा केली होती.
अनीशाची पंतप्रधानांसोबतची भेट सुमारे 10 मिनिटांपर्यंत चालली. पंतप्रधानांनी तिला चॉकलेट देखील दिले. अनीशाने पंतप्रधानांना तुम्ही येथेच बसता का?, हेच तुमचे ऑफिस आहे का? हे किती मोठे ऑफिस आहे असे प्रश्न विचारले. याच्या उत्तरादाखल पंतप्रधानांनी हे माझे कायमस्वरुपी कार्यालय नसून मी तुला भेटण्यासाठी येथे आलो होतो, असे सांगितले. तुम्ही गुजरातमधून आहात का? तुम्ही राष्ट्रपती कधी होणार असेही अनीशाने विचारले होते.