प्रतिनिधी / मडगाव
सावित्री कवळेकर या सांगेच्या मतदार नाही. तसेच सांगेत तिचे संघटन कार्य किती आहे तसेच पक्षाने आत्ता पर्यंत त्यांच्यावर किती जबाबदारी दिलेली आहे हे बघावे लागले. पक्षाने वारंवार असे सांगितलेय की, या कुटुंबात दोघांना उमेदवारी दिली जाणार नाही. सांगेतील कार्यकर्त्यांच्या विस्तारित बैठकीत डॉ. प्रमोद सावंत तसेच पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी वेळोवेळी याचा उल्लेख केलेला आहे असे सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई हे मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
भाजप व आपला सहवास हा गेल्या 25 वर्षांचा असून पक्षाचे सर्व उपक्रम हे आपल्या तर्फे राबविली जातात. मग ते मंडळाचे कार्यक्रम असो किंवा पक्ष पातळीवरील कार्यक्रम असो. पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी आपण यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पक्षाला जर आपल्या नेतृत्वाचे गुण आवडले असेल तर निश्चितच आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यावेळी म्हणाले.
सांगे मतदारसंघात पक्षाच्या संघटणेतील एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर त्याच्या विजयासाठी सर्व जण झोकून देऊन काम करणार असल्याचे सुभाष फळदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. आपण संघटणेचे कार्य करीत असल्याने आपल्यालाच उमेदवारी मिळणार याची खात्री आहे. पक्षाच्या बाहेरील व्यक्ती कार्यकर्त्यांना फुस लावून नेत असेल आणि दावा पेश करीत असेल तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र सद्या सांगे मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये कोणताच संभ्रम नसल्याची माहिती श्री. फळदेसाई यांनी दिली.
मंडळ किंवा पक्षाचे संसदीय मंडळ पक्षाचा उमेदवार ठरविणार, त्याला आमची संमती असेल. सावित्रीला उमेदवारी मिळणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे तिच्या नावाचा का उल्लेख केला जातोय हे चुकीचे आहे. पक्ष संघटणेतील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी देईल, त्यांच्यामागे सर्व कार्यकर्ते उभे राहून त्याला विजयी करतील. सांगे मंडळाचे माजी अध्यक्ष नवनाथ नाईक हे पक्षाच्या विरोधात जाऊन कार्य करीत आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार का असा सवाल केला असता, सुभाष फळदेसाई म्हणाले की, त्यांच्याकडे अगोदर पक्षातर्फे चर्चा केली जाईल. या चर्चेतून पुन्हा पक्षाच्या कार्यात येतील अशी खात्री आहे. आणि जर आले नाही तर पक्ष पुढील कृती करणार असल्याचे श्री. फळदेसाई यांनी सांगितले.
आप व तृणमूल काँग्रेस कोणाच्या मतांवर परिणाम करणार हे सर्वांना ठाऊक आहे. त्याचा अजिबात परिणाम भाजपच्या मतांवर होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
बुथ समित्या सक्रीय करणार
सांगे मतदारसंघात एकूण 46 बुथ आहेत. या बुथावर भाजपचे कार्यकर्ते संघटनात्मक कार्य म्हणून भेट देऊन तेथील कामाची उजळणी करणार आहेत. जर एखाद्या बुथावर कार्यकर्त्या कमी झालेला असेल तर नव्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी निवड केली जाणार आहे. पुढील तीन-चार दिवसात या कामाला प्रारंभ होईल. दर निवडणुकीत ही प्रक्रिया होत असते. मात्र, यावेळी जास्त लक्ष केंद्रीत करून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ज्या बुथावर 17 कार्यकर्ते असेल त्या बुथावर भेट दिली जाणार आहे. सांगे मतदारसंघात भाजपचे संघटनात्मक कार्य जबरदस्त आहे. पक्षाने जो कार्यक्रम दिला तो सांगे मतदारसंघात यशस्वी केला आहे. सांगे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला विजयी करायचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व रणनिती आखली जाईल. या मतदारसंघाच्या बाबतीत एक वेगळी चर्चा आहे. मात्र, येथील संघटन मजबूत असल्याने अशा चर्चाना विशेष किंमत देण्याची जरूरी नाही अशी माहिती जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर तसेच मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.